पुणे: दुचाकीस्वार महिलेने वाहतूक नियमन करणार्या महिला पोलिसाला शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचा प्रकार वारजे भागात घडला. या प्रकरणी वारजे पोलिसांनी दुचाकीस्वार महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत वारजे वाहतूक विभागातील पोलीस शिपाई ऋतुजा तांबे यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तांबे यांच्या फिर्यादीनुसार, वारजेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात वाहतूक शाखेतील पोलीस शिपाई ऋतुजा तांबे वाहतूक नियमन करत होत्या. त्या वेळी दुचाकीस्वार महिलेने वाहतूक नियमांचा भंग केला. विरुद्ध दिशेने निघालेल्या दुचाकीस्वार महिलेला पोलीस शिपाई तांबे यांनी अडवले.
दुचाकीस्वार महिलेवर कारवाई करताना तिने पोलीस शिपाई तांबे यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. तांबे यांनी सहकारी महिला पोलीस शिपाई चव्हाण यांना घटनेची माहिती दिली. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करत आहेत.