पुणे: हातउसने घेतलेले पैसे परत न दिल्याने झालेल्या वादातून महिलेचा ओढणीने गळा आवळून खून केल्या प्रकरणात नितीन चंद्रकांत पंडित (वय 51, रा. निसर्ग हाईटजवळ, धायरी) यास नांदेड सिटी पोलिसांनी अटक केली.
न्यायालयाने त्याला 9 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. ही घटना बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास मृत महिलेच्या धायरीतील रायकरमळा येथील सदनिकेत घडली. श्यामली कमलेश सरकार (वय 40, रा. सूर्यउज्ज्वल हाईट्स, रायकरमळा, धायरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिस हवालदार नीलेश तनपुरे यांनी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. (Latest Pune News)
श्यामली सरकार आणि आरोपी नितीन पंडित हे ओळखीचे होते. दोघांमध्ये आर्थिक व्यवहार होते. तिने पंडितकडून 40 ते 50 हजार रुपये उसने घेतले होते. हातउसने दिलेले हे पैसे पंडितने परत मागितले. मात्र, तिने पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यावरून दोघांमध्ये वाद झाले. घटनेच्या दिवशी दुपारी पंडित श्यामलीच्या सदनिकेत गेला. त्यांच्यात पुन्हा वाद झाला. रागाच्या भरात पंडितने तिचा ओढणीने गळा आवळून खून केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर पंडित हा बुधवारी रात्री नांदेड सिटी पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याने श्यामलीचा खून केल्याची कबुली दिली.
पंडितला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीने गुन्हा करण्यासाठी कोणकोणत्या साधनांचा वापर केला, त्याच्यासमवेत आणखी कोणी साथीदार होते का, याबाबत तपास करायचा आहे; तसेच आरोपीची वैद्यकीय तपासणी करायची आहे. त्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी तपास अधिकारी निरीक्षक गुरुदत्त मोरे व सरकारी वकील वर्षाराणी जाधव यांनी केली. ती मान्य करत न्यायालयाने आरोपीला 9 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.