मांडवगण फराटा: इनामगाव (ता. शिरूर) येथे बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला. लक्ष्मीबाई भोईटे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (दि. २५) पहाटे घडली. आतापर्यंत बिबट्याने शिरूरच्या पूर्व भागात घेतलेला हा चौथा बळी असून यामुळे भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे.
इनामगाव (ता. शिरूर) येथे शुक्रवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घराच्या पडवीत लक्ष्मीबाई भोईटे झोपलेल्या होत्या. बिबट्याने अचानक हल्ला करत त्यांना उचलून नेले. ही बाब कुटुंबाच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ स्थानिकांच्या मदतीने शेजारील उसात शोधायचा प्रयत्न केला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देत शोध मोहीम सुरू केली. यावेळी काही अंतरावरच भोईटे यांचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला आहे.
दरम्यान या पूर्वी मांडवगण फराटा येथे दोन, पिंपळसुटी येथे एक असे तीन लहान बालकांवर बिबट्याने हल्ला केला होता. त्यात तिघांचा मृत्यू झाला होता. हा चौथा बळी इनामगाव येथे वृद्ध महिलेचा घेतला असून आतातरी प्रशासन, वन विभागाने कडक पावले उचलत बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.