पिंपरखेड : पुढारी वृत्तसेवा : जांबूत (ता. शिरूर) येथे ५५ वर्षीय महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. २६) उघडकीस आली. मुक्ताबाई भाऊ खाडे असे या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण बेट भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Pune news)
मुक्ताबाई खाडे या रविवारी (दि. २५) सायंकाळ पासून बेपत्ता होत्या. परिसरात शोधाशोध करूनही मुक्ताबाई यांचा शोध लागला नाही. या भागात बिबट्याचा वावर असल्याने कुटुंबीयांनी वनविभागाला माहिती दिली. वनविभागाकडून परिसरातील शेतांमध्ये शोधाशोध केली असता सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास उसाच्या शेतात शोध घेतला असता लक्ष्मीबाई युवराज पळसकर यांच्या शेतात मुक्ताबाई यांचा मृतदेह आढळून आला. मुक्ताबाई यांच्या मृतदेहावर बिबट्याने हल्ला केल्याच्या खुणा आढळून आल्याने वनविभागाने बिबट्याच्या हल्ल्यात मुक्ताबाई यांचा मृत्यू झाल्याचे अधिकृतरित्या सांगितले. (Pune news)
या घटनेमुळे जांबूत आणि परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. तातडीने पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी जांबूत येथील संतप्त ग्रामस्थांनी केली आहे.
जांबूत परिसरात यापूर्वीही बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडल्या असून वनविभागाकडून गांभिर्याने घेतले जात नाही. घटना घडल्यावरच प्रशासनाकडून आणि राजकीय नेत्यांकडून संबंधित कुटुंबियांना भेट देऊन सहानुभूती व्यक्त केली जात असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.