Pune | साहेब..., तुकाराम मुंढेंसारखे अधिकारी तुमच्या खात्यात का नाहीत? 
पुणे

Pune | साहेब..., तुकाराम मुंढेंसारखे अधिकारी तुमच्या खात्यात का नाहीत?

शेतकरी महिलेचा भूमिअभिलेख उपसंचालकांना सवाल; विहीर हरवल्याने महिला झिजवत आहे सरकारी कार्यालयाचे उंबरठे

पुढारी वृत्तसेवा

पुणे : 'साहेब..., मला लई त्रास देतात तुमचे अधिकारी अन्‌ कर्मचारी, आमच्यासमोर लाच मागत्यात, लाच घेत्यात. त्यांना सरळ करा की... साहेब... तुकाराम मुंढेंसारखे अधिकारी तुमच्या खात्यात का नाहीत? ' हा संवाद आहे एक शेतकरी महिला आणि सरकारी कार्यालयातील उच्चपदस्थ अधिकार्‍यातला.

शुक्रवार, दि. १७ जुलैची दुपारची वेळ. विभागीय आयुक्त कार्यालयासमोरील प्रशासकीय भवनमधील भूमिअभिलेख विभागाचे उपसंचालक यांच्या दालनात एक महिला शेतकरी आपली फाईल घेऊन आली. सासवडजवळच तिचे गाव; पण शेतातील विहीर अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नोंदीमुळे दुसर्‍याच्या शेतात दाखवली. त्यामुळे ही महिला शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून माझी मोजणी पुन्हा व्यवस्थित करून द्या. या कामासाठी भूमिअभिलेख विभागात चकरा मारत आहे. तिची गाठ खूप दिवसांनी एका प्रामाणिक अन्‌ कडक शिस्तीचे अधिकारी उपसंचालक यांच्या सोबत पडते. त्यांच्यात झालेला हा संवाद असा होता...

शेतकरी महिला : साहेब, माझी विहीर काही वर्षांपासून हरवली आहे. ही कागदपत्रे पाहा, मला न्याय द्या?

उपसंचालक : बाई बसा... आधी तुम्ही... शांत व्हा, मला नीट सांगा काय झालं ते?

शेतकरी महिला : अहो साहेब... माझ्या मालकीची विहीर... तुमच्या अधिकार्‍याच्या चुकीमुळे दुसर्‍याच्या शेतात गेली. मी कागदपत्रे दिली. २००८ पासून भांडत आहे. पण, माझी विहीर मला मिळत नाही. एक मॅडम अधिकारी आहेत. ती सारखी बसवून ठेवते मला. आमदारांची शिफारस आण म्हणते.

उपसंचालक : तुम्हाला मी सांगितलं होतं मागे की, तुमचे काम तीन महिन्यांत झालं नाही तर थेट माझ्याकडे या म्हणून? तुम्ही आला का? माझ्याकडे ते सांगा?

शेतकरी महिला : (समोर उभ्या असलेल्या महिला अधिकार्‍यांकडे पाहत) साहेब... तुमच्या या मॅडमसोबतच बोलत आहे मी, तुम्ही लय बिझी असता म्हणून त्यांनाच सर्वकाही सांगत होते.

उपसंचालक : फोन करून सासवडच्या अधिकार्‍याला ही सर्व केस समजून सांगतात आणि मग या शेतकरी महिलेला सांगतात. तुम्ही सासवडच्या आमच्या कार्यालयात मंगळवारी जावा. तुमचे काम होईल.

शेतकरी महिला : पण साहेब, मला सांगा, या तुमच्या अधिकार्‍यांना लाज कशी वाटत नाही. गरीब अन्‌ शिक्षण नसलेल्या शेतकर्‍यांना खोटं बोलतात? दोन-दोन तास जेवतच बसतात. अहो साधं पाणी बी प्यायला देत नाहीत. तिथं गेल्यावर तिथल्या मॅडम म्हणतात, लोक बाटलीत पाणी आणतात... ही पद्धत आहे का बोलण्याची...

उपसंचालक : अरे कोण आहे तिकडे? यांना पाणी, चहा आणा... (शिपाई चहा, पाणी आणि प्लेटमध्ये शेंगदाण्याचा लाडू घेऊन येतो.)

शेतकरी महिला : (ओशाळून तोंडाला पदर लावून रडू लागते...) साहेब, तुम्ही चांगले आहात हो... मला चहा, पाणी इचारलं... पण तिकडचे अधिकारी लई त्रास देत्यात. पैसे खाऊन काम बी नीट काम करीत नाहीत. मला सांगा तुकाराम मुंढेंसारखे अधिकारी नाहीत का तुमच्या खात्यात?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT