Pune QR Code Data Breach: पुण्यातील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलेल्या तरुणीसोबत घडलेल्या कथित डेटा प्रायव्हसी उल्लंघनाच्या प्रकारामुळे सोशल मीडियावर चर्चा होत आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत कंटेंट क्रिएटर ऋषिका दत्ता यांनी आपल्यासोबत घडलेला अनुभव शेअर केला असून, QR कोडद्वारे ऑर्डर करताना ग्राहकांची वैयक्तिक माहिती किती असुरक्षित असू शकते, याबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
ऋषिका दत्ता यांनी सांगितल्यानुसार, त्या पुण्यातील FC रोडवरील प्रसिद्ध रेस्टॉरंट येथे गेल्या होत्या. रेस्टॉरंटमध्ये QR कोड स्कॅन करून त्यांनी मेन्यू पाहिला, ऑर्डर केली आणि बिल भरले. . मात्र रात्री घरी गेल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला.
सुरुवातीला त्यांनी तो मेसेज दुर्लक्षित केला. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी मेसेज पाहिल्यानंतर त्यांना धक्का बसला. कारण मेसेज करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला त्या रेस्टॉरंटमधील कर्मचारी असल्याचे सांगितले होते. “मी काल तुम्हाला सर्व्ह केलं होतं,” असं सांगत त्याने सुरुवातीला मैत्रीपूर्ण पद्धतीने संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि नंतर त्यांचे वय विचारल्याचा दावा ऋषिका यांनी केला आहे.
या संपूर्ण प्रकाराचे स्क्रीनशॉट शेअर करत त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, ग्राहकांनी QR कोड स्कॅन करून दिलेला मोबाईल नंबर किंवा वैयक्तिक माहिती रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांकडे कशी पोहोचली? आणि ती वैयक्तिक हेतूंसाठी वापरली जात असेल, तर ग्राहकांची सुरक्षा धोक्यात आहे?
ऋषिका यांनी आपल्या व्हिडिओत म्हटलं की, “आज फक्त एक मेसेज आला. पण जर घराचा पत्ता किंवा इतर माहिती मिळाली असती, तर उद्या दार ठोठावलं असतं?” त्यांच्या या वक्तव्यामुळे डेटा सुरक्षेबाबतची चिंता वाढली आहे.
या घटनेनंतर त्यांनी रेस्टॉरंटच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधल्याचेही सांगितले. त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी केली असता, व्यवस्थापनाने त्या कर्मचाऱ्याला संपूर्ण फ्रँचायझीतून काढून टाकल्याचे सांगितले. मात्र त्याबाबत लेखी पुरावा किंवा लेटर देण्यास नकार दिला, असा आरोप त्यांनी केला आहे.
याशिवाय, औपचारिक माफी किंवा व्यवस्थापनाकडून अधिकृत संपर्क करण्याची मागणीही त्यांनी केल्याचे सांगितले. मात्र या घटनेनंतर अद्याप कोणतीही लेखी माफी किंवा अधिकृत प्रतिसाद मिळालेला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
ऋषिका दत्ता यांनी हा प्रकार फक्त वैयक्तिक अनुभव म्हणून न पाहता, डेटा सुरक्षेचा गंभीर मुद्दा म्हणून मांडला आहे. त्यांनी लोकांना सावध राहण्याचे आवाहन करत म्हटले की, “पुढच्या वेळी QR कोड स्कॅन करताना लक्षात ठेवा, तुम्ही फक्त जेवण ऑर्डर करत नाही, तर तुमचा डेटाही देत आहात.”
दरम्यान, सोशल मीडियावर या व्हिडिओनंतर अनेकांनी अशाच प्रकारच्या अनुभवांबाबत प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. याआधीही food delivery apps, cab services आणि इतर प्लॅटफॉर्मवर ग्राहकांच्या नंबरचा गैरवापर झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे डिजिटल युगात डेटा प्रायव्हसी आणि ग्राहक सुरक्षा हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.