पुणे

पुणे : अर्धा टक्का व्याजाचा बोजा सहन करण्यास राज्य सह. बँक तत्त्वतः तयार

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: केंद्र शासनाकडून तीन लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जावर बँकांना मिळणारे अनुदान चालूवर्षी दोनवरून दीड टक्क्का म्हणजे अर्धा टक्क्याने कमी केले आहे. शासनाच्या आवाहनानुसार हा अर्धा टक्क्यांचा बोजा सोसण्यास राज्य सहकारी बँकेने तत्त्वतः मान्यता दिली असल्याची माहिती बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली. याबाबत कायदेशीर माहिती घेण्यात येत असून तसा कृती आराखडाही तयार करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील 111 वर्षे जुन्या असलेल्या राज्य सहकारी बँकेस शुक्रवारी (दि.23) केंद्रीय सहकार विभागाचे प्रधान सचिव ग्यानेश कुमार यांच्यासह राज्याचे सहकार व पणन विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार आणि नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे (एनसीडीसी) संचालक पंकज बन्सल यांनी भेट दिली. या कार्यक्रमात सहकारचे प्रधान सचिव अनुप कुमार यांनी केंद्राने कमी केलेला अर्धा टक्का व्याज अनुदानाचा बोजा राज्य बँकेने सोसण्याची सूचना केली. त्यावेळी ही सूचना तत्त्वतः मान्य केल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून  विविध बँकांमध्ये गुंतवणूक केली जाते. ही गुंतवणूक राज्य बँकेमध्ये संबंधितांनी करायला हवी. अर्धा टक्का व्याजाचा बोजा सहन करायचा झाल्यास राज्यातील एकूण पीक कर्ज वाटप आणि त्यावरील राज्य बँकेला नेमकी किती आर्थिक बोजा सहन करावा लागेल, ही माहितीसुध्दा संकलित केली जाईल. त्यानंतर राज्य सरकार आणि राज्य बँकेचीही संयुक्त बैठक होऊन पुढील निर्णय घेतला जाईल.

यावेळी बोलताना सहकारचे अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार म्हणाले, राज्याच्या सहकारातील त्रिस्तरीय रचनेचे महत्व व राज्यात असलेल्या सुमारे 21 हजार विकास सहकारी सोसायट्या व 31 जिल्हा बँकांच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला. राज्य बँकेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजित देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रगतीचे व बँक राज्यातील सहकार क्षेत्रासाठी करत असलेले सकारात्मक कार्य कौतुकास्पद आहे. बँकेच्या प्रगतीबरोबरच याचा परिणाम सहकारातील सर्वसामान्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचतो हे महत्वाचे आहे. तसेच राज्य बँकेचा सेवक वर्गही अभिनंदनास पात्र आहे.

                                       – ग्यानेश कुमार, प्रधान सचिव, सहकार मंत्रालय, दिल्ली.

केंद्राच्या सहकार विभागाचे प्रधान सचिव ग्यानेश कुमार यांचा सत्कार करताना विद्याधर अनास्कर, समवेत डावीकडे अनुप कुमार व अन्य मान्यवर.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT