मान्सून 
पुणे

Weather News: मान्सून गेला; पण आता पडणाऱ्या रात्रीच्या तुफान पावसाचे जाणून घ्या कारण

कडक उन्हामुळे वाढला ढगांच्या निर्मितीचा वेग!

आशिष देशमुख

Latest Weather News: यंदा ऑक्टोबर हीटचा तडाखा आणि पडलेला भरपूर पाऊस यामुळे जमिनीसह वातावरणातील आर्द्रता जास्त आहे. त्यामुळे पाण्याचे ढगात रूपांतर होऊन राज्यातील विविध भागांत दररोज रात्री धो-धो पाऊस कोसळत आहे.

यंदा दिवाळीपर्यंत म्हणजे 31 ऑक्टोबरपर्यंत हा पाऊस सुरू राहील. त्यामुळे थंडीचे आगमन किंचित लाबणार असून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून थंडी पडेल, असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी वर्तविला आहे.

यंदा मोठा पाऊस 26 सप्टेंबरपासून पूर्ण थांबला आणि लगेच कडक उन्हाचे चटके जाणवू लागले. राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने जमीन अजूनही खूप ओली आहे. तसेच बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात निर्माण होणार्‍या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे राज्यात सतत बाष्पयुक्त वारे येत आहेत.

त्यामुळे जमिनीसह वातावरणातील बाष्पापासून दिवसाच्या कडक उन्हामुळे ढगांची निर्मिती वेगाने होत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी धो धो पाऊस पडत आहे. शास्त्रज्ञांच्या मते, हा स्थानिक परिणाम असून त्या त्या गावातील बाष्पाच्या प्रमाणानुसार हा पाऊस कमी किंवा जास्त पडतो आहे.

मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस

परतीचा मान्सून राज्यातूनच नव्हे, तर देशातून 15 ऑक्टोबर रोजीच गेला. मग हा अवकाळी पाऊस का पडतोय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याचे कारण हवामानशास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, सध्या ऑक्टोबर हीटचा चटका आहेच.

कमाल तापमान 31 ते 35 अंशांवर जात आहे. त्यामुळे ओल्या जमिनीतील बाष्प आणि वातावरणातील बाष्प यांच्यामुळे ढगांची निर्मिती होते. त्यांना शास्त्रीय भाषेत क्युम्युलोनिंबस ढग म्हणतात. हे ढग पांढरेशुभ्र असतात. त्यात विद्युतप्रभारही असतो. त्यामुळे मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडतो आहे.

क्युम्युलोनिंबस ढग म्हणजे काय?

आकाशात पिंजलेल्या कापसाप्रमाणे पांढरेशुभ्र ढग दिसतात. त्यांना हवामानशास्त्राच्या भाषेत ‘क्युम्युलोनिंबस ढग’ असे नाव आहे. या ढगांत विद्युतभार असतो. त्यामुळे त्यातून विमाने जात नाहीत. हे ढग रात्रीच्या वेळी त्यात रासायनिक प्रक्रिया झाल्याने विजांचा कडकडाट अन् मेघगर्जना करत पाऊस पडतो. त्यामुळे या ढगांना गरजणारे आणि बरसणारे ढग, असे हवामानशास्त्रज्ञ संबोधतात. ढगफुटीसाठी हेच ढग कारणीभूत असतात.

याआधी असे वातावरण कधी होते?

हवामान शास्त्रज्ञांच्या मते दरवर्षी ऑक्टोबरमध्ये कडक उन्हामुळे असा पाऊस पडतो. मात्र, यंदा त्याची वारंवारिता जास्त आहे. असाच प्रकार अलीकडच्या काळात 2019 व 2022 मध्ये झाला होता. 2022 मध्ये दिवाळी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात 28 ऑक्टोबर रोजी होती. त्या वर्षी 25 ऑक्टोबरपर्यंत शेतात पाणी साचलेले होते. दिवाळीत पाऊस होता. तसेच 2019 मध्येही अशीच स्थिती होती. त्या वर्षी राज्यात खूप चांगला पाऊस झाल्याने आर्द्रता जास्त होती.

सध्या वातावरणात आर्द्रता जास्त आहे. पाऊस चांगला झाल्याने जमिनीवरच्या मातीत बाष्प आहे. तसेच दिवसा कडक ऊन आहे. पूर्वेकडून बाष्पयुक्त वारेही येत आहे. त्यामुळे क्युम्युलोनिंबस ढग वेगाने तयार होत आहेत. त्यामुळे हा पाऊस पडतोय. दिवसभराचा वेळ ढगनिर्मितीसाठी जातो. त्यामुळे रात्री यात रासायनिक प्रक्रिया होऊन पाऊस पडतो आहे.
- डॉ. अनुपम कश्यपी, माजी हवामान विभागप्रमुख, आयएमडी, पुण
सध्या जो पाऊस पडतोय, त्याला आम्ही ‘लोकल इफेक्ट’ असे संबोधतो. सध्या वातावरणात आर्द्रता खूप आहे. जमिनीत बाष्प खूप आहे. कडक उन्हामुळे त्याचे ढगांत रूपांतर होऊन रात्री पाऊस पडतो आहे. ही प्रक्रिया ऑक्टोबरमध्ये होतच असते. कारण ऑक्टोबर हीटमुळे वातावरणात अस्वस्थता निर्माण होऊन त्याचे रूपांतर पावसात होते. यंदा दिवाळीपर्यंत म्हणजे साधारण 31 ऑक्टोबरपर्यंत असा पाऊस सुरू राहील, असा अंदाज आहे. थंडी किंचित उशिरा म्हणजे नोव्हेंबरमध्ये पडेल, तेव्हा हा पाऊस बंद होईल.
- डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ, आयएमडी, पुणे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT