पुणे

पिंपरी : उद्यानांतील स्थापत्य कामाचा दर्जा राखला जाणार का?

अमृता चौगुले

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : निगडी येथील दुर्गा टेकडी, तसेच भक्ती- शक्ती समूह शिल्प उद्यान आणि इतर उद्यानात स्थापत्यविषयक कामे केली जाणार आहेत. त्यासाठी 58 लाख 72 हजार 642 इतक्या खर्चाची निविदा महापालिकेच्या स्थापत्य उद्यान विभागाने काढली होती. मात्र, तब्बल 41.42 टक्के कमी दराने हे काम करण्यास तयार असलेल्या ठेकेदाराला हे काम देण्यात आले आहे. या कमी दरात कामाचा दर्जा सांभाळला जाणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

प्रभाग क्रमांक 15 मधील विविध उद्यानांचे स्थापत्यविषयक कामे करण्यासाठी स्थापत्य उद्यान विभागाने 58 लाख 72 हजार 642 खर्चाची निविदाप्रकिया राबविली होती. त्यासाठी एकूण 11 ठेकेदारांच्या निविदा प्राप्त झाल्या. रणजीत वसंतराव झेंडे , पी. जे. मोटवानी, ओमकार दत्तात्रय बुर्डे, आर. एम. एन्टरप्रायजेस, एम. जी. माने, मयूर पवार, एस. एस. एन्टरप्रायजेस, आर. सी. साळुंखे, तावरे कन्स्ट्रक्शन, कपिल कन्स्ट्रक्शन आणि ए. जी. असोसियटेस या सर्व 11 निविदा प्राप्त ठरल्या. त्या सर्वांच्या निविदा तब्बल 41.42 टक्के ते 30.33 टक्के इतक्या कमी दराच्या आहेत.

रणजीत झेंडे यांची निविदा 41. 42 टक्के कमी म्हणजे 34 लाख 85 हजार 818 रुपये इतक्या खर्चाची आहे. दहा टक्क्यांपेक्षा अधिक दर कमी असल्याने त्या ठेकेदारांकडून अनामत रक्कम 3 ऑगस्ट 2023 ला जमा करून घेण्यात आली आहे. इतक्या कमी दराने काम करण्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे. दरम्यान, सर्वच ठेकेदारांनी 30 टक्केपेक्षा अधिक दर भरल्याने स्थापत्य उद्यान विभागास या कामांचे योग्य रित्या अंदाजपत्रक तयार करता आले नसल्याचे स्पष्ट होत आहे. दुसरीकडे, जवळजवळ निम्म्या दरात काम केले जाणार असल्याने काम दर्जाचा राखला जाणार का, अशी शंका उपस्थित होत आहे.

कृषी विद्यापीठाचे 53 माळी नेमणार

महापालिकेचे शहरात एकूण 195 सार्वजनिक उद्यान आहेत. तसेच, उद्यान विभागाच्या तीन नर्सरी आहेत. उद्यान विभागाकडे माळी कर्मचार्‍यांची कमतरता आहे. उद्यान विभागात केवळ 13 माळी कार्यरत आहेत. उद्यान विभागास एकूण 80 माळी कर्मचार्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे राज्यातील विविध चार कृषी विद्यापीठांतून विद्यार्थ्यांची यादी मागविण्यात आली होती. विद्यापीठाने सन 22-23 या वर्षात माळी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेल्या 119 विद्यार्थ्यांची यादी महापालिकेस दिली होती.

त्यातील 53 विद्यार्थी कागदपत्रांच्या पडताळणीस उपस्थित होते. त्यांना 11 महिन्यांसाठी उद्यानात माळी कामासाठी नेमण्यास येरार आहे. त्यांना दर महिन्यास 25 हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. प्रत्येक महिन्यास एकूण 53 माळी यांचे विद्यावेतन 13 लाख 25 हजार इतके होते. अकरा महिन्यांसाठी 1 कोटी 45 लाख 75 हजार इतका खर्च येणार आहे. या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.

80 लाखांची सिजनल रोपांची खरेदी

महापालिकेचे रस्ते, उद्याने, मोकळ्या जागा, चौक आदी ठिकाणी लागवडीसाठी उद्यान विभागाकडून सिजनल रोपे खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी 80 लाख रुपये खर्चाची निविदा काढण्यात आली होती. त्यासाठी 6 निविदा प्राप्त झाल्या. त्यातील जी. जी. एन्टरप्रायजेसची 1 टक्के कमी दराची 79 लाख 20 हजार रुपये खर्चाची निविदा पात्र ठरली. तर, बी. व्ही. रेड्डी कन्स्ट्रक्शन प्रा. लि.चा 1.60 टक्के अधिक दर आहे. महिन्याभरात ही रोपे पुरविली जाणार आहेत. या खर्चास आयुक्तांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.

SCROLL FOR NEXT