पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणार्या पवना, इंद्रायणी व मुळा या तीन नद्या मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्या आहेत. नदीपात्रात फेस, पाण्यास दुर्गंधी, प्रदूषणामुळे माशांचा मृत्यू, जलपर्णीत वाढ, तसेच डासांचा प्रादुर्भाव असे प्रकार आता शहरवासीयांना नित्याचे झाले आहेत. अशा घटनेनंतर प्रशासनकडून थोडी फार धावपळ केली जाते. पुन्हा 'जैसे थे' परिस्थिती निर्माण होते. या तीनही नद्यांचे पुनरुज्जीवन (सुधार) करण्यासाठी महापालिका प्रकल्प राबवीत आहे. कोट्यवधींचा खर्च करूनही नद्यांचे पाणी गुजरातमधील साबरमतीप्रमाणे खरेच स्वच्छ होणार का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
सध्या शहरातील नद्यांची अवस्था बिकट आहे. पावसाळ्यातील दोन, तीन महिने सोडल्यास नदीचे पात्र मोठ्या गटारासारखे दिसते. प्रदूषणामुळे पाणी काळपट झाल्याने त्यास मोठी दुर्गंधी येते. नदीकाठच्या रहिवाशांना डासांचा सामना करावा लागतो. मोठ्या प्रमाणात वाढलेली जलपर्णी काढण्यासाठी दरवर्षी सुमारे पाच कोटींचा खर्च होतो. शहरात अनेक ठिकाणी मैलासांडपाणी तसेच, रासायनिक सांडपाणी थेट नाल्यात सोडले जाते. ते नदीत जाऊन मिसळते. महापालिकेलाही शहरातून जमा होणार्या सर्व 100 टक्के मैलासांडपाण्यावर प्रक्रिया करून ते नदीत सोडण्यात यश आलेले नाही. नदी पात्रात अचानक फेस येणे. माशांचा मृत्यू होणे, असे प्रकार सातत्याने होत आहेत. त्याबाबत आरडाओरड झाल्यानंतर महापालिकेकडून एका दोघांवर कारवाई केली जाते. थोड्या दिवसांनी पुन्हा 'जैसे थे' परिस्थिती निर्माण होते.
नदी पुनरूज्जीवनाचे तीनही नद्यांचे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पात्र स्वच्छ व सुंदर होणार आहे. त्यामुळे पर्यटनास चालना मिळणार आहे, असा महापालिकेच्या अधिकार्यांचा दावा आहे. आतापर्यंत नदी स्वच्छ करण्यासाठी महापालिकेने मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. मात्र, नदीपात्रे काही स्वच्छ झालेली नाहीत. पाणी स्वच्छ करण्यापेक्षा केवळ सुशोभीकरणात महापालिकेस रस असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे प्रकल्प राबविल्यानंतरही नदीचे पाणी स्वच्छ होईल का ? शहरात नदी सुधार प्रकल्प राबविल्यास वरील भागातील नदीपात्रांची स्वच्छता कशी होणार, अशी शंका उपस्थित केली जात आहे. नदी प्रदूषणाकडे लक्ष वेधण्यासाठी शहरातील पर्यावरणप्रेमींनी नुकतेच आंदोलनही केले.
312 पैकी 280 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया; महापालिकेचा दावा
शहरात दररोज 312 एमएलडी मैलासांडपाणी तयार होते. त्यापैकी 280 एमएलडी पाण्यावर महापालिकेच्या विविध 9 ठिकाणच्या 14 सांडपाणी शुद्धीकरण केंद्रांत (एसटीपी) प्रक्रिया केली जाते. त्यानंतर ते सांडपाणी नदी पात्रात सोडले जाते. केवळ 32 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते सांडपाणी थेट नदी पात्रात सोडले जाते, असा दावा महापालिकेने केला आहे; मात्र शहरात दररोज 500 एमएलडीपेक्षा अधिक सांडपाणी तयार होत असल्याचा अंदाज आहे.
मंजुरीची प्रतीक्षा
अहमदाबादमधील साबरमती नदीच्या धर्तीवर महापालिका या तीन नद्यांसाठी पुनरूज्जीवन प्रकल्प राबवित आहे. त्यासाठी तब्बल 3 हजार 506 कोटींचा खर्च केला जाणार आहे. प्रकल्पांमुळे नद्या स्वच्छ व सुंदर होणार तसेच, नदी काठ परिसर सुशोभीकरण होईल, असा महापालिकेचा दावा आहे. मुळा नदीच्या पहिल्या टप्प्यातील 8.80 किलोमीटर अंतराचे कामासाठी ठेकेदार नेमला आहे. राज्याच्या पर्यावरण खात्याकडून सुधारित ना हरकत दाखला न मिळाल्याने काम सुरू झालेले नाही. तर, पवना व इंद्रायणी नदी आराखड्यास राज्य शासनाची अंतिम मंजुरी दोन ते तीन वर्षापासून प्रलंबित आहे.
शहरातून वाहणार्या नद्यांची अवस्था
नदी पात्रात फेस
पात्रात जलपर्णी फोफावतेय
पाण्यास दुर्गंधी
दुषित पाण्यामुळे डासांच्या वाढता प्रादुर्भाव
जल प्रदूषण वाढल्याने माशांच्या मृत्यू
नदी पात्रात टाकला जातो राडारोडा व कचरा
नदी पात्रात अतिक्रमणाचे वाढते प्रमाण
प्रक्रिया न करताच नाल्यात सोडले जाते रासायनिक व मैलासांडपाणी
अतिक्रमणामुळे नदी पात्र झाले अरूंद
पुराचे पाणी वाहून न गेल्याने नदीचे पाणी शिरते रहिवाशी भागात
जलप्रदूषण रोखण्यासाठी महापालिका हे करत आहे
पवना, इंद्रायणी व मुळा नदी पुनरूज्जीवन प्रकल्प राबवित आहे.
शहरातील सर्व ड्रेनेजलाइन व नाल्यांचे सर्वेक्षण करत आहे.
नदीत सांडपाणी मिसळू नये म्हणून ड्रेनेजलाइन जवळच्या एसटीपीला जोडत आहे.
नदीकाठ सुशोभीकरणासाठी खासगी जागा ताब्यात घेत आहे.
नदीत राडारोडा टाकण्यावर नजर ठेवण्यासाठी भरारी पथके.
शहरातील सर्व एसटीपींचे अद्ययावतीकरण.
नदी सुधार प्रकल्पासाठी 200 कोटींच्या बॉण्ड विक्रीतून कर्ज.