पुणे: ‘लोकसहभागाची सुरुवात मी स्वतःपासून करणार आहे. ‘स्वच्छ, सुंदर, विकसित कसबा’ या अभियानात खारीचा वाटा म्हणून सार्वजनिक ठिकाणी माझे अनधिकृत फ्लेक्स कधीच लावणार नाही,’ असा निर्णय मी घेतला आहे.
सोमवारी पत्रकार परिषद आयोजित कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी करून याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, ‘इंदूरप्रमाणेच ‘स्वच्छ कसबा सुंदर कसबा’ या अभियानाच्या यशस्वितेसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. गेल्या तीन महिन्यांत मतदारसंघातील कचर्याचे 26 क्रॉनिकल स्पॉट सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर बंद करण्यात यश मिळाले आहे.
राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त येत्या बुधवारी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत या 26 ठिकाणी ‘स्वच्छता नारायणा’ची महापूजा आयोजित केली आहे. स्वच्छतेसाठी आवश्यक असणार्या साहित्याचे पूजन या वेळी केले जाणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ सकाळी 11 वाजता न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग शाळेजवळ विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.
अभियानात अधिकाधिक लोकसहभाग वाढविण्याच्या उद्देशाने या ‘स्वच्छता नारायण महापूजा’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले असून, बहुसंख्य नागरिकांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
क्रॉनिकल स्पॉट बंद करण्यासह परिसरात स्वच्छता राहण्यासाठी आवश्यकतेनुसार कर्मचार्यांची संख्या वाढविली आहे. काही भागांमध्ये दोन वेळा कचरा संकलित करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रक्रियेला पुढील काळात आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली जाणार आहे. कचरामुक्त झालेल्या परिसराचे लवकरच सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
‘स्वच्छ, सुंदर कसबा अभियान गती घेत असताना विकसित कसबा साकारण्याच्या उद्देशाने गेली तीन महिने मतदारसंघातील विविध स्तरांवरील नागरिकांशी सतत संपर्क साधला. त्यानुसार पुढील पाच वर्षांसाठी विकसित कसब्यासाठी प्राधान्यक्रम निश्चित केले असून, त्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. आगामी काळात या विकासकामांचा पाठपुरावा करणार आहे.