पुणे

वडगाव मावळ : दिलेला शब्द पूर्ण करणार; मी नारळफोड्या नाही ! आ. सुनील शेळके यांचा टोला

अमृता चौगुले

वडगाव मावळ : मावळ तालुक्याच्या विकासासाठी गेल्या चार वर्षांत 1432 कोटी 11 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, सुमारे 350 कोटींची कामे मंजूर आहेत. या वर्षभरात विकासकामांसंदर्भात दिलेला शब्द मी पूर्ण करणार असल्याचे सांगून मी नारळफोड्या नाही. त्यामुळे मी कुठेल्याही कामाचा नारळ फोडत नाही, असा टोला आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषदेत लगावला.

पत्रकार परिषदेस राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, जिल्हा सरचिटणीस विठ्ठलराव शिंदे, कार्याध्यक्ष साहेबराव कारके, मुख्य संघटक संजय बाविस्कर, युवकअध्यक्ष किशोर सातकर उपस्थित होते. आमदार शेळके यांनी या वेळी गेल्या चार वर्षांच्या कार्यकाळातील कामे व निधीचा लेखाजोखा मांडत प्रत्यक्षात आलेला निधी 1432 कोटी व मंजूर असलेला निधी 350 कोटी असा सुमारे 1750 कोटी रुपये मावळसाठी मिळाल्याचे सांगितले.

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून निधी मिळत नसल्याने शेळके यांनी तीनही अधिवेशनात बोलताना हवं तर त्यांच्या हातून नारळ फोडा, पण निधी थांबवू नका, अशी भूमिका घेतली होती. यावर बोलताना माजी मंत्री संजय भेगडे यांनी आम्हाला श्रेय घ्यायची हौस नाही, नारळ त्यांनीच फोडावे असा टोला मारला होता. आज शेळके यांनी या विषयावर बोलताना मला जनतेने कामे करण्यासाठी निवडून दिले आहे, मी नारळफोड्या नाही, नारळ फोडत बसलो तर 365 दिवस फोडत बसावे लागेल असा टोला लगावला.

वडगावसाठी 81 कोटी 8 लाखांचा निधी उपलब्ध उपलब्ध झालेल्या निधीमध्ये तळेगाव दाभाडे साठी 63 कोटी 72 लाख, लोणावळासाठी 92 कोटी 15 लाख, वडगावसाठी 81 कोटी 8 लाख, देहूसाठी 32 कोटी 84 लाख, देहूरोडसाठी 87 कोटी 90 लाख तसेच ग्रामीण भागामध्ये सार्वजनिक बांधकाम अंतर्गत 256 कोटी, जलजीवन मिशन अंतर्गत 191 कोटी व इतर हेडच्या माध्यमातून हा निधी मिळाला असल्याचे सांगितले.

निधीचा लेखाजोखा देण्याचे आवाहन
निधींबद्दल माहिती देताना मी लेखाजोखा देतोय, तुम्ही तुमच्या 1600 कोटींचा लेखाजोखा द्या असे आव्हान पुन्हा एकदा दिले. खोटे श्रेय घेण्याऐवजी त्यांनी सत्तेचा व पक्षात असलेल्या वर्चस्वाचा वापर करून तालुक्यासाठी काहीतरी नवीन आणावे, असे आव्हान आमदार शेळके यांनी केले.

बिनबुडाचे आरोप खपवून घेणार नाही
माजी मंत्री भेगडे यांनी जलजीवन मिशन योजनेतील भ्रष्टाचाराबाबत केलेल्या आरोपाचे खंडन करताना आमदार शेळके यांनी मावळच्या माय भगिनींनी मला पाण्याचे पैसे खायला आमदार केले नाही, उलट मी केलेल्या तक्रारीमुळे या योजनेतील सुमारे 150 कोटी रुपये शासनाचे वाचले असल्याचे सांगितले. तसेच टक्केवारी, कमिशनद्वारे मी कोणाची भाड खात नाही असा सडेतोड खुलासा करत यापुढे असे बिनबुडाचे आरोप खपवून घेणार नाही, आता पोलखोल करेन असा इशाराही दिला.

'ही' दहा कामे मंजूर करून दाखवा
न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याऐवजी माजी मंत्री भेगडे यांनी त्यांचे पक्षात असलेले वजन व राज्यात, केंद्रात असलेल्या सतेच्या जोरावर भंडारा डोंगरावरील मंदिर उभारणीसाठी निधी, तळेगाव परिसरातील डिफेन्सचा रखडलेला मोबदला, पवना प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, मावळ गोळीबारातील 12 जखमींना नोकर्‍या, आढले-डोणे उपसा सिंचन योजना, क्रीडासंकुल, एमआयडीसी टप्पा 4 मधील इको सेन्सेटिव्ह झोन काढणे, लोणावळा येथील स्कायवॉकसाठी निधी, देहूरोड येथील रेडझोनचा प्रश्न व मुंबई पुणे महामार्गावरील आवश्यक ठिकाणचे उड्डाणपूल ही दहा कामे मंजूर करून आणावीत, असे खुले आव्हान आमदार शेळके यांनी दिले आहे.

'ते' फक्त निमंत्रित सदस्य
राज्य सरकार व जिल्हा नियोजनच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांच्या निधीची वलग्ना करणारे जिल्हा नियोजन समितीचे फक्त निमंत्रित सदस्य आहेत. त्यांना फक्त 25 लाख रुपये निधीचेच अधिकार आहेत, अशी टीका आमदार शेळके यांनी केली. दरम्यान, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य विठ्ठलराव शिंदे यांनीही निमंत्रित सदस्याला फक्त 25 लाख रुपयांचाच अधिकार असतो, असे सांगून शेळके यांनी केलेल्या टिकेला समर्थन दिले.

तळेगावसाठी 63 कोटी 72 लाखांचा निधी
सन 2019 खाली आमदारपदी विराजमान झाल्यानंतर तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीमध्ये एकूण 63 कोटी 72 लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले. तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या हद्दीमध्ये रस्ते/गटार बांधणीसाठी 38 कोटी, नगर परिषद इमारतीसाठी 18 कोटी 80 लाख, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर निवाससाठी 1 कोटी 12 लाख, सामाजिक सभागृहासाठी 47 लाख, कब्रस्थान परिसर सुधारण्यासाठी 40 लाख, विद्युत शवदाहिनीसाठी 60 लाख. राज्य उत्पादन शुल्क इमारतीसाठी 3 कोटी 91 लाखांचा निधी दिला असल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT