कुरकुंभ, पुढारी वृत्तसेवा: कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगिक क्षेत्रातील रसायने चोरीचे प्रकरण चांगलेच गाजलेले आहे. कंपन्यांतून रसायने चोरी चोरट्यांना कशी शक्य झाली, याची चर्चा रंगली होती. आता नवीन पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील तसेच अन्य अधिकारी रुजू झाल्यानंतर त्यांच्याकडून या चोर्यांचा छडा लागणार का? असा सवाल होत आहे.
चोर्यांचे प्रकार पुन्हा घडू नये म्हणून कंंपनी व्यवस्थापक आणि सुरक्षा विभागाने आतातरी कुठल्या उपाययोजना केल्या की नाही, हे पोलिसांनी तपासण्याची गरज आहे. पोलिस बदलीच्या प्रक्रियेनंतर पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक (बारामती विभाग) आनंद भोईटे, तसेच दौंडचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील हे नवीन अधिकारी म्हणून रुजू झाले असून, त्यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची गरज आहे.
गेल्या सहा महिन्यांपूर्वी केमिकल चोरांनी अक्षरश: धुमाकूळ घातला होता. मेल्झर केमिकल्स, इटरनिस फाइन केमिकल, हारमोनी ऑरगॅनिक्स प्रा. लि. तसेच एमक्युअर फार्मास्युटिकल कंपनीत (दोनवेळा चोरी) अशा चार वेगवेगळ्या कंपन्यांतून मिळून साधारण 6 कोटी 38 लाख 26 हजार 246 रुपयांचे केमिकल चोरी झाले आहे. दौंड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असून, मेल्झर आणि इटरनिस कंपन्यांतील चोरीचा छडा लावून चोरांच्या मुसक्या आवळण्यात दौंड व कुरकुंभ पोलिसांना यश आले. काही प्रमाणात मुद्देमालही हस्तगत केल्याचे बोलले जात आहे. या चोरीची पाळेमुळे कुरकुंभ, मुंबईसह परराज्यात पोहचली होती. तेथून काहींना अटक केली. मात्र, हारमोनी व एमक्युअर कंपन्यांतील चोर्यांचा तपास अजून सुरूच आहे.
केमिकलची चोरी झाली तिथे जबाबदार अधिकार्यांशिवाय कर्मचार्यांना प्रवेशास परवानगी नसते. कंपनी गेटसमोर सर्वसामान्य नागरिक थांबला तरी सुरक्षारक्षक कसून चौकशी करतात. मात्र, कंपनीतून केमिकल चोरून नेले त्या वेळेस सुरक्षारक्षक काय करीत होते, असा प्रश्न आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, कंपनी व्यवस्थापक, सुरक्षा विभागाचे अधिकारी यांच्या देखरेखीत काम चालते, असे सांगण्यात येते. तरीही कोट्यवधींचे केमिकल चोरी झाल्याने अश्चर्य व्यक्त केले जात आहे. हे महागाडे केमिकल कशासाठी वापरले जाते, ते हाताळायचे कसे, कोणत्या प्रक्रियेत वापरले जाते, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे यासंबंधी अधिकारी सांगू शकतात. केमिकल सांभाळण्याची व सुरक्षितेची जबाबदारी कंपन्यांची आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने चोरांनी डाव साधला. त्यामुळे पोलिसांच्या मागे काम वाढले.