Pune Elections: आंबेगाव विधानसभा मतदारसंघात चुरस वाटली नाही. विकासकामांच्या जोरावर सहज निवडून येईल, असा विश्वास महायुतीचे उमेदवार आणि सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बुधवारी (दि.20) व्यक्त केला. निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील मतदान केंद्रावर दिलीप वळसे पाटील यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
दिलीप वळसे पाटील म्हणाले, या मतदारसंघातील मतदारांनी मला सात वेळा निवडून दिले आहे. आठव्या वेळी मी विजयी होईल. निवडणुकीत चुरस वाटली नाही. आंबेगाव विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आले नसल्याचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर वळसे पाटील म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण रेकॉर्ड करून पाठवले होते. त्यांना दुसरीकडे जबाबदारी होती. केलेल्या विकासकामाच्या जोरावर जनता मला निवडून देईल.
माझी कन्या पूर्वा वळसे पाटील हिने मंचर येथे प्रचाराच्या सांगता सभेत केलेले भाषण हे माझ्यासाठी अनपेक्षित होते. तिने या आधी माझ्यासमोर कधी एवढे मोठे भाषण केले नाही. ती गेली तीन-चार महिने रात्रंदिवस या निवडणुकीमध्ये काम करत होती. या निवडणुकीत कार्यकर्ते आणि मतदारांनी जो अभूतपूर्व पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचा मी ऋणी आहे, असे वळसे पाटील यांनी सांगितले.