पुणे

झाडांच्या पुनर्रोपणाला वणव्याची झळ; सिंहगड रस्ता उड्डाणपुलासाठी काढली 180 झाडे

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या कामास अडथळा ठरणार्‍या 180 झाडांचे नवीन मुठा कालव्यालगतच्या जागेत पुनर्रोपण करण्यात आले आहे. मात्र, या जागेवर वारंवार होणाऱ्या आगीच्या घटनांचा फटका पुनर्रोपण केलेल्या झाडांना बसत आहे. आगीच्या घटना आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे काही झाडे जळाली असून, अनेक झाडे जागेवरच वाळून गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रकल्पांसाठी काढलेल्या वृक्षांचे पुनर्रोपण केवळ फार्सच असतो की काय असा सवाल उपस्थित होत आहे.

नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता) परिसरातील वडगाव, धायरी, नर्‍हे, खडकवासला गावांचा झपाट्याने विकास होत आहे. या परिसरातून शहरात ये-जा करणार्‍या वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच सिंहगड रस्त्याला दुसरा पर्यायी रस्ता नसल्याने वाहतूक कोंडीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने राजाराम पूल ते फन टाईम थिएटर यादरम्यान उड्डाणपूल उभारण्याचे काम हाती घेतले आहे. या पुलाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून, पुढील दोन वर्षांत हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

उड्डाणपुलाच्या कामामध्ये अडथळा ठरणारी 180 लहान-मोठी झाडे काढण्यात आले आहेत. त्यांचे पुनर्रोपण करणार्‍या ठेकेदार कंपनीने महापालिकेने सुचविलेल्या नवीन मुठा कालव्यालगतच्या जागेत केले आहे. या ठिकाणी तोडलेल्या 180 झाडांच्या पुनर्रोपणासह एकास तीन प्रमाणे 540 झाडे लावल्याचा दावा उड्डाणपुलाचे काम करणार्‍या संबंधित कंपनीने केला आहे. त्यांच्या देखभालीचे कामही कंपनीकडून करण्यात येत असून, टँकरद्वारे पाणी देण्यात येत असल्याचेही सांगितले.

दरम्यान, दैनिक 'पुढारी' प्रतिनिधीने प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर पुनर्रोपण केलेल्या काही झाडांनाच पालवी फुटल्याचे आणि बहुसंख्य झाडे वाळून गेल्याचे दिसले. तसेच कोणत्याही झाडाला टँकरने पाणीपुरवठा केल्याचे दिसले नाही. तसेच अनेक झाडे जळाल्याचेही निदर्शनास आले आहे. कालव्यालगतच्या मोकळ्या जागेत मोठ्या प्रामाणात रात्रीच्या वेळी अनधिकृतपणे राडारोडा आणून टाकला जातो. शिवाय उद्यान विभागाचा पालापाचोळा आणि कचराही आणून टाकला जातो. हा कचरा आणि पालापाचोळा अनेकवेळा पेटवून दिला जातो. त्यामुळे पुनर्रोपण केलेली व पाण्याअभावी वाळून गेलेली झाडे जळून खाक झाल्याचे पाहायला मिळते.

125 झाडे सुस्थितीत

उड्डाणपुलाच्या कामासाठी काढलेल्या झाडांचे पुनर्रोपण कालव्याच्या शेजारी असलेल्या जागेत करण्यात आले आहे. मात्र, या ठिकाणी वारंवार आगीच्या घटना घडत असल्याने काही झाडे जळाली आहेत. मात्र पुनर्रोपण केलेल्या 180 झाडांपैकी सव्वाशे झाडे सुस्थितीमध्ये असल्याचा दावा महापालिकेच्या अधिकार्‍यांनी केला आहे.

SCROLL FOR NEXT