पुणे, पुढारी वृत्तसेवा : अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनजंय मुंडे (Dhananjay Munde) यांना बीडचे पालकमंत्री करू नका. त्यांना मंत्री पदावरून खाली खेचणे गरजेचे आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) या विषयावर गप्प का आहेत ? तुम्ही का बोलतं नाही. मुंडे यांचे संरक्षण पवार का करत आहेत ?, असा सवाल माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी केला आहे. वाल्मीक कराड आज (दि.३१) पुण्यात सीआयडी पोलिसांना शरण आला. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे पत्रकार परिषदेत बोलत होते. (Santosh Deshmukh Murder Case)
ते पुढे म्हणाले की, कराड पुण्यात कसा होता. पोलिसांना कळले नाही का? दोन नगरसेवक त्याच्यासोबत आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. बीडमध्ये आक्रोश मोर्चा झाला. त्याची दखल सरकाराला घ्यावी लागेल. हे सीआयडीचे यश आहे, असे म्हणणार नाही. मानसिक दबाव असल्याने तो शरण आला आहे. तो अक्कलकोट जातो, बाहेर फिरतो. तरीही बावीस दिवस यंत्रणेला का कळत नाही.
कालच धनजंय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटतात आणि आज सरेंडर होतो, यात काय कळत नाही. धनजंय मुंडे मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करतात. आणि आज लगेच कराड शरण येतो. हॉस्पिटलमध्ये राहतो. तीन दिवस पुण्यात होता. काय तर गडबड आहे. याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही संभाजीराजे यांनी यावेळी केली.