अजय कांबळे
कुरकुंभ: दौंडच्या ग्रामीण भागात विशेषत: गाय, बैल या मोकाट सोडलेल्या जनावरांचा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे. एकेकाळी गाय-बैलांची वेगळी क्रेझ होती, आता ती राहिली नाही. जागोजागी जनावरांचे कळपच्या कळप मोकाट फिरताना दिसून येतात. मात्र, यावर कुठलीच शासकीय यंत्रणा प्रामाणिकपणे काम करत नाही. त्यामुळे या जनावरांची व्यथा कधी समजणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दौंडच्या ग्रामीण भागात मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला आहे. यात गाय व बैलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. जनावरांचे कळपच्या कळप रस्त्यावर फिरताना दिसतात. मुळात ही जनावरे पाळीव असल्याचे अनेकदा समोर आले आहे.
मात्र मूळ मालक आणि धंदा करणारे जनावरांच्या खाण्या-पिण्याकडे लक्ष देत नाही. भूक लागल्यावर बहुतांश जनावरे कचरा-कुंड्यावर दाखल होतात. येथील कचरा, खराब भाजीपाला व खाण्याचे पदार्थ हेच त्यांचे अन्न झाले आहे.
कचऱ्यातील प्लास्टिक पिशव्या, दूध पावडरचे रिकामे पत्र्याचे डब्बे, तारा, वायर, काचा, खिळे, लोखंडी व प्लास्टिक तुकडे अशा विविध वस्तूंचा या जनावरांना धोका असतो. बऱ्याच जनावरांच्या पोटात प्लास्टिक व तोंडात पत्र्याचे डब्बे अडकून बसतात, याकडे कोणाचे लक्ष गेले तर ते जनावर वाचते; अन्यथा त्रास सहन करावा लागतो. असे अनेक प्रकार घडले आहेत.
गाय, बैलांच्या तोंडात अडकलेले डब्बे काढणे मुश्किल काम असते. जनावरांना बेशुद्ध करून डब्बे काढावे लागतात. या कामासाठी रेस्क्यू पथकाची गरज लागते. काही सामाजिक कार्यकर्ते व जनावरांचे डॉक्टर या कामासाठी नेहमी प्रयत्न करतात. अशा प्रसंगात यश न आल्यास जनावरांचे जीव गेलेले आहेत. बहुतांश जनावरांची कोणत्याही शासन दरबारी नोंद नाही.
त्यामुळे एखादी घटना घडल्यास मूळ मालकदेखील हात वर करतात. जनावरांच्या कळपामुळे वाहतूक कोंडी होते. त्याचबरोबर ही जनावरे अचानकपणे रस्त्यावरून धावत सुटतात. त्यामुळे अपघातांचे प्रमाणदेखील वाढले आहे. असे प्रकार दौंड तालुक्यातून गेलेल्या पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग व बेळगाव-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर सर्रास दिसून येते. याबाबत नेहमीप्रमाणे स्थानिक शासकीय यंत्रणा मूग गिळून गप्प असते.
कत्तलीचा फोफावला
पूर्वी विशेषत: गाय-बैल असेल तो मोठा माणूस समजला जात होता. आत्ता परिस्थिती वेगळी आहे. लहान वयाचे गाय, बैल, म्हैस अशी विविध जनावरे घेतात. त्या जनावरांना दिवसभर मोकाट सोडून देतात. जनावरांना दिवसभर फिरून चरून रात्री पुन्हा घरी येण्याची सवय लावली जाते. अशा पद्धतीने जनावरांना मोठे केले जाते. यानंतर जनावरांच्या जिवावर पैसे कमावण्याचा धंदा केला जातो. चांगले पैसे येतील इतके मोठी झालेल्या जनावरांची कत्तल केली जाते. वर्षांनुवर्षे हा गोरखधंदा जोमाने केला जात आहे.