Who is Umesh Tagunde: पुण्यातील उमेश तागुंदे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांच्या आध्यात्मिक कार्यक्रमांशी संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये काही महिला अनुयायी उमेश तागुंदे यांचे पाणी आणि दुधाने पाय धुताना आणि त्यानंतर ते दूध प्राशन करताना दिसत आहेत. त्यामुळे उमेश तागुंदे नेमके कोण आहेत, त्यांचा व्यवसाय काय आहे आणि त्यांची पार्श्वभूमी काय आहे, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
उमेश तागुंदे हे पुण्यातील वारजे-माळवाडी परिसरातील रहिवासी आहेत. ते आध्यात्मिक गुरू म्हणून ओळखले जातात. त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर धार्मिक कार्यक्रम, आरती, भक्तांचे कार्यक्रम आणि विविध धार्मिक विधींचे व्हिडीओ पाहायला मिळतात. याच माध्यमातून त्यांच्याशी संबंधित अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
उमेश तागुंदे यांनी स्वतः दिलेल्या माहितीनुसार, त्यांचं शिक्षण बारावीपर्यंत झालं आहे. त्यांचं काही शिक्षण वाघोली परिसरात झालं. त्यानंतर त्यांनी शिवणे येथील नवभारत हायस्कूलमध्येही शिक्षण घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र शिक्षणानंतर त्यांनी नोकरी करण्याऐवजी व्यवसाय करायचा निर्णय घेतला.
उमेश तागुंदे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा सुरुवातीपासूनच दुग्ध व्यवसायाशी संबंध आहे. त्यांच्याकडे एकेकाळी मोठ्या संख्येने गायी होत्या. त्यांच्याकडे सुमारे 30 ते 50 गायी असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र नंतर जागेची अडचण आणि गायींच्या शेणाची विल्हेवाट लावण्याची समस्या यामुळे त्यांनी गायींची संख्या कमी केली. सध्या त्यांच्याकडे काही गायी असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दूध व्यवसायासोबतच त्यांचे इतर व्यवसायही आहेत. त्यांचा हॉटेलचा व्यवसाय आणि भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. भाजी चिरून ती पॅक करून देण्याचाही व्यवसाय ते करतात. त्यामुळे एकाच व्यवसायावर अवलंबून न राहता ते वेगवेगळे व्यवसाय करत आहेत.
उमेश तागुंदे हे जागा खरेदी करून काही काळानंतर ती विकण्याचा व्यवसाय करत असल्याचं सांगितलं आहे. याशिवाय काही ठिकाणी खोल्या बांधल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यांच्या कुटुंबाच्या जुन्या मालमत्तेवर बांधकाम करण्यात आलं असून, त्या बांधकामातून भाड्याचं उत्पन्न मिळत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
उमेश तागुंदे यांच्याशी संबंधित धार्मिक कार्यक्रमांचे व्हिडीओ यापूर्वीही सोशल मीडियावर उपलब्ध होते. मात्र अलीकडे व्हायरल झालेल्या काही व्हिडीओंमुळे ते मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले आहेत. या व्हिडीओमध्ये त्यांचे काही अनुयायी पाणी आणि दुधाने त्यांचे पाय धुताना दिसतात. त्यानंतर ते दूध प्राशन करत असल्याचेही व्हिडीओमध्ये दिसत आहे.