अभिजित आंबेकर
शिरूर : शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुतीत सरळ लढत होण्याची दाट शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार अॅड. अशोक पवार यांची उमेदवारी निश्चित आहे. महायुतीचा निर्णय झालेला नसून, अनेक इच्छुक असल्याने महायुतीचा उमेदवार कोण असेल? याची उत्सुकता कायम आहे. सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. गेल्या अडीच वर्षांत राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर शिरूर-हवेलीतही राजकीय गणिते बदललेली आहेत.
महायुतीत हा मतदारसंघ कोणाकडे राहणार, यावरच जोरदार रस्सीखेच सुरू आहे. विद्यमान आमदार अविभाजित राष्ट्रवादीचे असल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मतदारसंघावर हक्क सांगितला जात आहे. तसे सूतोवाच पालकमंत्री अजित पवार यांनीही केले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादापाटील फराटे इच्छुक आहेत. हवेलीतील राष्ट्रवादीचे नेते शांताराम कटके हेसुध्दा इच्छुक आहेत, तर भाजपने हा मतदारसंघ भाजपचा पारंपरिक मतदारसंघ असून, 1995 पासून भाजप या ठिकाणी निवडणूक लढवत आहे. मागील निवडणुकीत भाजपचे स्व. माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांचा पराभव झाला असला, तरी मतदारसंघ परंपरेने आमचा असल्याचा दावा ठोकला आहे.
विद्यमान आमदार अशोक पवार यांनी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षाबरोबर राहणे पसंत केले आहे. पहिल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात शिरूरसह हवेली तालुक्यातील तसेच शिरूर शहरात अनेक मोठ्या योजना पवार यांनी राबविल्या. त्यात न्यायालयाची इमारत, नगरपरिषद नवीन इमारत, एस. टी. बसस्थानक बीओटीवर विकसित केले, बाजार समिती नवीन इमारत, पंचायत समिती नवीन इमारत, शहरातील रस्ते, अशी अनेक विकासकामे मार्गी लागली.
महायुतीच्या नंतरच्या अडीच वर्षांत मात्र तालुक्याची कामधेनु असलेला घोडगंगा सहकारी साखर कारखाना सरकारच्या पाठिंब्याअभावी बंद झाला. अठरा हजार सभासद असलेल्या ’घोडगंगा’बाबत अशोक पवार यांच्यावर आरोप होऊ लागले. लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा गाजेल, असे विरोधकांना वाटत असताना तो जास्त चर्चलिा गेला नाही आणि मतदानावर त्याचा परिणामही झाला नाही. आता तर राज्य शासनाने कर्जहमी न दिल्यामुळे ’घोडगंगा’ला कर्ज मिळाले नाही, हे उघड झाले आहे. आमदार पवार यांनी तसा आरोप केला तसेच मुंबई उच्च न्यायालयानेही ’घोडगंगा’च्या कर्जाचे पैसे राखीव ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे हा विषय विधानसभा निवडणुकीत येईल की नाही, याबद्दलच शंका व्यक्त होऊ लागली आहे.
भाजपचे शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे प्रचारप्रमुख, जिल्हा बँकेचे संचालक, माजी जि. प. अध्यक्ष प्रदीप कंद, जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्षा जयश्री पलांडे आदी भाजपकडून इच्छुक आहेत. महाविकास आघाडीत असलेले शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिरूर-हवेली विधानसभा समन्वयक ज्ञानेश्वर ऊर्फ माउली कटके हेसुध्दा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादीला असल्याने आगामी काळात ते काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे. निवडणूक अतिशय रंगतदार होणार असली, तरी महायुतीचा चेहरा ठरल्यावर चित्र स्पष्ट होईल.
2004:
भाजपचे स्वर्गीय बाबूराव पाचर्णे (विजयी) 70,601
राष्ट्रवादी काँग्रेसचे पोपटराव गावडे 61,041
बाबूराव पाचर्णे 9,560 मतांनी विजयी
2009
राष्ट्रवादी काँग्रेस अशोक पवार 53,936
अपक्ष बाबूराव पाचर्णे 46,369
अशोक पवार 7,567 मतांनी विजयी
2014 :
राष्ट्रवादी अशोक पवार 81,638
भाजप बाबूराव पाचर्णे 92,519
भाजपचे बाबूराव पाचर्णे 10,881 मतांनी विजयी
2019:
राष्ट्रवादीचे अशोक पवार 14,4738
भाजपचे बाबूराव पाचर्णे 10,3370
राष्ट्रवादीचे अशोक पवार 41,368 मतांनी विजयी