उरुळी कांचन : पुणे शहर आयुक्तालय व पुणे ग्रामीण अधीक्षक कार्यालयात सामाविष्ट होण्याच्या प्रक्रियेत 'कधी इकडे, कधी तिकडे' अशा अधांतरित निर्णयात गेली अडीच वर्षे उरुळी कांचनचा स्वतंत्र पोलिस ठाण्याचा मुद्दा अडखळत पडला आहे. या पोलिस ठाण्यास अडीच वर्षांपूर्वी आर्थिक खर्चासह आस्थापनांची मंजुरी मिळूनही फक्त पोलिस ठाण्यात सेवकवर्ग उपलब्ध करून औपचारिकता बाकी असताना पुणे ग्रामीण अधीक्षक कार्यालयांतर्गत उरुळी कांचन पोलिस ठाण्याचा कार्यभार सुरू करण्यास पोलिस दलाची इच्छाशक्ती कमी पडत आहे.
वाढत्या नागरीकरणाने उरुळी कांचन परिसरासाठी स्वतंत्र पोलिस ठाणे तातडीने सुरू होणे गरजेचे बनले आहे. लोणी काळभोर पोलिस ठाण्यातून उरुळी कांचन परिसरासाठी स्वतंत्र पोलिस ठाण्यासाठी शासन मंजुरी मिळालेली आहे. 23 मार्च 2021 रोजी लोणी काळभोर पोलिस ठाण्याचा उरुळी कांचनसह संपूर्ण भाग पुणे शहर पोलिस आयुक्तालयाला जोडला होता, त्यानंतर पुन्हा शासनाने 5 ऑक्टोबर 2021 रोजी पुणे शहरात 7 नवीन व पुणे ग्रामीण पोलिस दलात 5 नवीन पोलिस ठाण्यांना मंजुरी दिली होती. मात्र, या पाच पोलिस ठाण्यांपैकी माळेगाव (बारामती) व पारगाव (आंबेगाव) ही पोलिस ठाणी एक वर्षापूर्वी झाली आहेत; मात्र उरुळी कांचन, सुपे व निरा नृसिंहपूर ही तीन पोलिस ठाणी लटकली आहेत. मनुष्यबळाअभावी सुरू होऊ शकली नाहीत.
पुणे शहरात लोणी काळभोर पोलिस ठाण्याचा समावेश झाल्यानंतर उरुळी कांचन दूरक्षेत्रासाठी अधिकचे मनुष्यबळ मिळेल, अशी अपेक्षा असताना उरुळी कांचन परिसरासाठी फक्त एक अधिकारी व चार ते पाच कर्मचारी, असा कर्मचारीवर्ग मिळाल्याने या कर्मचारीवर्गाकडून कायदा व सुव्यवस्था सोडाच; पण किरकोळ गुन्ह्यांचे उकलीकरण होत नसल्याची विदारक स्थिती आहे. दरवर्षी या ठिकाणी संपूर्ण राज्यात खळबळ उडेल, अशी गुन्हेगारी घटना घडत असल्याचे चित्र आहे. तर 'गुन्हेगारीला मोकळे रान व वसुलीला मानपान' अशा अवस्थेत शहरी पोलिस दलात चित्र आहे.
नागरिकांना हवीय शहर पोलिस दलातून सुटका?
उरुळी कांचन परिसरासाठी स्वतंत्र ग्रामीण पोलिस ठाणे मंजूर झाल्याने या ठिकाणी तत्काळ पोलिस ठाणे सुरू व्हावे म्हणून अनेकांनी पुणे ग्रामीण अधीक्षकांना निवेदने देऊ केली आहेत. मात्र, दरवेळी मनुष्यबळाअभावी पोलिस ठाणे सुरू करता येणार नाही अथवा स्वातंत्र्यदिनी, प्रजासत्ताकदिनी, महाराष्ट्रदिनी पोलिस ठाणे चालू होणार, अशी आश्वासने मिळत आहेत. नागरिकांनाही गुन्हेगारी, दहशत व वाहतूक कोंडीपलिकडे काही आश्वासक चित्र पाहायला मिळत नसल्याने शहर पोलिसांकडून सुटका हवी आहे.
ग्रामीण पोलिस दलात मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने मंजूर 3 ठाण्यांची कार्यवाही सुरू होऊ शकली नाही. परंतु, जसजसे मनुष्यबळ उपलब्ध होईल तसतशी पोलिस ठाणी सुरू करण्याचा प्रयत्न सुरू राहील. या पोलिस ठाण्यांसाठी मंगळवारी (दि. 18) ग्रामीण पोलिस दलाची आढावा बैठक घेणार आहे. उरुळी कांचन पोलिस ठाणे होण्यासाठी लवकरच कार्यवाही करू.
अंकित गोयल, अधीक्षक, पुणे ग्रामीण पोलिस