पुणे

हडपसर : नाल्यांची साफसफाई पूर्ण होणार तरी कधी ?

अमृता चौगुले

हडपसर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पावसाळा तोंडावर आला असताना हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरातील ओढ, नाल्यांच्या
साफसफाईचे काम कधी पूर्ण कधी होणार ? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. ड्रेनेजमधील गाळ काढला असून,
तो रस्त्यावर पडून आहे. पावसाळ्यापूर्वी हे ढीग उचलले नाही, तर हा गाळ पुन्हा ड्रेनेजमध्ये जाऊन ते तुंबण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी मगरपट्टा चौकात ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता.

परिसरातील ड्रेनेज व नाल्यांच्या साफसफाईकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. हडपसर परिसरात मुसळधार पाऊस झाला, तर प्रामुख्याने मगरपट्टा चौक, ससाणेनगर, माळवाडी, अमरधाम, रविदर्शन कॉर्नर, डीपी रस्ता भाग , मगरपट्टा रोड, नोबल हॉस्पिटल, कालिका डेअरी कॉर्नर, महादेवनगर 15 नंबर आदी परिसरातील रस्त्यांवर पावसाचे पाणी तुंबल्याने मोठी समस्या निर्माण होत आहे. नालासफाई व ड्रेनेज सफाई व्यवस्थित होत नसल्याने ही समस्या निर्माण होत आहे. सहायक आयुक्त प्रकाश पाटील म्हणाले की, हडपसर परिसरातील ओढे, नाल्यांच्या साफसफाईचे काम लवकरच पूर्ण केले जाईल.

पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असतानाही महापालिकेने पावसाळी वाहिन्या, नाले, ओढे व ड्रेनेजच्या साफसफाईचे काम अद्याप पूर्ण केले नाही. दरवर्षी सोलापूर मार्गावरील शेवाळेवाडी उपबाजारसमोर पावसाचे पाणी तुंबते. हडपसर भागातही काही ठिकाणी ही समस्या उद्भवत आहे. प्रशासनाने साफसफाईची कामे पूर्ण करावीत.

                                          -संभाजी गायकवाड,
रहिवासी, हडपसर.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT