मोशी : झपाट्याने विकास होत असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बोर्हाडेवाडी परिसरातील सुमारे दोनशे एकरच्या आसपास असलेले शेतीक्षेत्र निवासीक्षेत्र कधी होणार, असा सवाल गेल्या सोळा वर्षांपासून बोर्हाडेवाडीतील शेतकरी उपस्थित करत आहेत.
शेतकर्यांचे आर्थिक नुकसान
कृषिक्षेत्र निवासी करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पडून आहे. सदर भागातील जमीन कृषीक्षेत्र असल्याने स्थानिक शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. जमिनीचा विकास करताना त्याला कवडीमोल भाव मिळत आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या मंजूर विकास योजनेत आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजन नियंत्रणाखाली येणार्या बोर्हाडेवाडी येथील दोनशे एकर शेती विभागातील जमीन निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव 20 ऑक्टोबर 2008 साली झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर तो मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता, त्याला आता सोळा वर्षे होत आली. मात्र, अद्याप याबाबत राज्य सरकारकडून निर्णय घेण्यात आलेला नाही.
जमिनीला भाव मिळेना
या भागात हरित झोन असल्याने त्यावरील बांधकामासाठी महापालिकेकडून परवानगी मिळत नाही. निवासी झोन नसल्याने शेतकर्यांनादेखील शहरात राहून आपल्या जमिनीवर बांधकाम करता येत नाही. शिवाय जमिनीची किंमतदेखील कमी आहे. या अडचणींचा स्थानिक शेतकर्यांना सामना करावा लागत आहे. रस्ते आणि आरक्षणे विकसित होत असताना शेती मात्र, विकसित करता येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
निवासी क्षेत्र करण्याची मागणी
या भागातील जमीन निवासी क्षेत्र झाल्यास स्थानिक शेतकर्यांना त्याचा लाभ होणार आहे. जमिनी कवडीमोल किंमतीत बिल्डरला न विकता शेतकरी स्वतः विकसक बनू शकणार आहेत. शिवाय हक्काने चार पैसे जास्त मिळणार असल्याने त्याचा फायदा शेतकर्यांच्या कुटूंबाच्या उन्नतीसाठी होणार आहे. यामुळेच सोळा वर्षांपासून पडून असलेला निवासी क्षेत्र करण्याचा प्रस्ताव यंदा तरी मंजूर व्हावा, अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे आहे.
परिसर विकासापासून वंचित
चार बाजूंनी निवासी क्षेत्राने व्यापलेला बोर्हाडेवाडी परिसर मध्येच शेती क्षेत्र असल्याने विकासापासून वंचित राहिला आहे. मोठं मोठे ग्रहपकल्प शेजारी उभे राहत असताना बोर्हाडेवाडीत मात्र शेतकर्यांना शेती करण्याची वेळ आली आहे. निवासी क्षेत्र झाल्यास सर्वांगीण विकास होणार असून शेतकर्यांना न्याय मिळणार आहे.