पुणे

पुणे : जेव्हा स्फोटाच्या आवाजाने महापालिका हादरते…!

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास महापालिकेत एकापाठोपाठ एक तीन स्फोट झाले अन् कामानिमित्त आलेल्या नागरिकांसह अधिकारी व कर्मचार्‍यांच्या काळजाचा ठोका चुकला… इमारतीमध्ये धुराचे लोळ उठले… सुरक्षा रक्षकांची धावपळ सुरू झाली… सर्वांना इमारतीच्या बाहेर काढले… तत्काळ अग्निशमन दलाची वाहने आणि रुग्णवाहिकाही दाखल झाल्या… पंधरा मिनिटे धावपळ चालल्यानंतर हा संपूर्ण प्रकार 'मॉकड्रील'चा भाग असल्याचे समजल्यावर सर्वांचा जीव भांड्यात पडला.

महापालिका भवनामध्ये कामानिमित्त आलेले नागरिक आणि एका विभागातून दुसर्‍या विभागात जाणार्‍या कर्मचारी, अधिकार्‍यांची वर्दळ सुरू असतानाच गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास इमारतीमध्ये एकामागे एक चार साखळी स्फोट झाले. याच वेळी धुराचे लोळही आल्याने एकच धावपळ सुरू झाली. घाबरलेल्या नागरिकांनी, कर्मचार्‍यांनी इमारतीतून पळ काढत सुरक्षित
ठिकाणे गाठली.

धावपळीचा हा गोंधळ सुरू असतानाच अवघ्या चार मिनिटांत महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या. स्फोटामुळे जखमी झालेल्या 4 जणांना व दुसर्‍या आणि चौथ्या मजल्यावर अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले. हा सर्व थरार तीन ते चार हजार नागरिकांनी अनुभवला. या मॉकड्रीलच्या घटनेत अवघ्या दहा मिनिटांत महापालिकेची पूर्ण इमारत रिकामी करण्यात आली. विशेष म्हणजे महापालिकेतील इतर कर्मचारी व अधिकार्‍यांसोबत महापालिका आयुक्तांनाही बाहेर काढून हिरवळीवर थांबविण्यात आले होते.

शेवटी जागतिक आपत्ती व्यवस्थापन दिनाच्या निमित्ताने, तसेच नागरिकांकडून आपत्तीच्या काळात कशा प्रकारे काळजी घ्यावी, या उद्देशाने महापालिकेच्या अग्निशमनदलाचे मॉकड्रील असल्याचे उजेडात आले आणि सर्वांचाच जीव भांड्यात पडला. महापालिकेच्या चार अग्निशमनदलाकडील 50 कर्मचार्‍यांच्या मदतीने हे मॉकड्रील करण्यात आले.

त्यात, एक फायर टेंडर, 70 मीटर उंच शिडी असलेली ब—ांटो गाडी, एक रेस्क्यू व्हॅन, दोन रुग्णवाहिकांचा वापर करण्यात आला. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख गणेश सोनुने, सुरक्षा विभाग प्रमुख यांच्यासह अग्निशमन दलाचे 40 कर्मचारी आणि महापालिकेचे सुरक्षा रक्षकही यात सहभागी झाले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT