कात्रज; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील मनसेचे फायरब्रँड नेते माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी अनेक वेळा पक्षाच्या शहर कोअर कमिटीच्या कार्यपद्धतीवर उघड नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एका विवाह सोहळ्यात 'तात्या कधी येताय, मी वाट पाहतोय…'अशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची एक खुली ऑफर मोरे यांना दिली आहे. यामुळे मोरे यांच्या पक्षांतराच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे.
शहरातील एका विवाह सोहळ्यात मोरे उपस्थित होते. त्या ठिकाणी पवार कार्यकर्त्यांसह आलेले होते. दोघांनीही एकमेकांना नमस्कार केला. त्यानंतर पवार यांनी मोरेंशी हस्तांदोलन केले. त्या वेळी 'तात्या कधी येताय, मी वाट पाहतोय', अशी खुली ऑफर पवार यांनी मोरेंना देऊन टाकली. मनसेच्या भोंग्यांच्या विषयावरून पक्षविरोधी भूमिका घेत माझ्या प्रभागातील मुस्लिम बांधवांच्या मशिदीवरील भोंगे उतरवणार नाही, अशी भूमिका मोरे यांनी घेतली होती. त्यानंतर पक्षाने त्यांना तत्काळ शहराध्यक्ष पदावरून हटविले होते.
यामुळे मोरे नाराज असल्याची चर्चा माध्यमांत सुरू होती. विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी त्यांना आपल्या पक्षात येण्याच्या ऑफर दिल्या होत्या. मात्र, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः पुढाकार घेत मोरेंची नाराजी दूर करीत बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली. त्यामुळे मोरे यांची नाराजी काहीअंशी दूर झाली व ते पुन्हा एकदा सक्रियपणे पक्षाच्या कामाला लागले.
मनसे शहर कोअर कमिटीच्या कार्यपद्धतीवरून दोन दिवसांपूर्वीच मोरे यांनी पुन्हा एकदा निशाणा साधत आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर एका विवाह सोहळ्यात पवार यांनी मोरे यांना खुल्ली ऑफर दिल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. या वेळी राष्ट्रवादीच्या प्रमुख शहर नेत्यांनी आमचे नाही किमान दादांचे (अजित पवार) तरी ऐका, असे सांगितले.
पक्ष बदलण्याचा विचार नाही : मोरे
या संदर्भात मनसे नेते वसंत मोरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या आवाहनाला दुजोरा दिला. राज्याचा एवढा मोठा नेता स्वतः त्यांच्या पक्षात येणाचे निमंत्रण देतात, हे अजित पवार यांच्या मनाचा मोठेपणा आणि माझ्या कार्याची पावती आहे, मी मानतो. मात्र, पक्ष बदलण्याबाबत मी विचार केला नसल्याचे मोरे यांनी सांगितले.