पुणे

पुरंदर तालुक्यातील गव्हाचा पेरा घटला : शेतकरी अडचणीत

Laxman Dhenge

वाल्हे : पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यात पावसाअभावी पाणीटंचाई निर्माण झाल्याने मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या रब्बी हंगामातील गव्हाचा पेरा घटला आहे. तर अनेक गावांत गव्हाची वाढ खुंटली आहे. त्यामुळे गव्हाच्या उत्पादनातदेखील घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या वर्षी पुरंदर तालुक्यात पावसाने दडी मारली. बहुतांश भागात अत्यल्प प्रमाणात पाऊस पडला. तरीदेखील पुढील काही दिवसांत पाऊस पडेल या आशेवर अनेक शेतकर्‍यांनी रब्बी हंगामातील पिकांची पेरणी केली. त्यामध्ये गव्हाची तालुक्यात एकूण 2 हजार 576 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. मागील वर्षी गहू पेरा हा 2 हजार 738 हेक्टर क्षेत्रात होता.

मात्र, पावसाअभावी पेरलेले गहू उगवलेच नाही. तर काही शेतकर्‍यांची उगवलेला गहू पाण्याच्या कमतरतेने जळून गेला. ज्या शेतकर्‍यांचा गहू जगला त्या पिकालाही ऑक्टोबर महिन्यातील उष्णता व अवकाळी पावसाचा फटका बसला. गव्हाची वाढ खुंटली गव्हाचे उत्पादन घटले. काहींचा गहू तर पूर्णपणे जळून गेला. इतर पिकांचीही तीच अवस्था झाली आहे.सध्या तालुक्यातील अनेक गावांत, वाड्या-वस्त्यांवर पाण्याची टंचाई जाणवत आहे. काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे.

पुरंदर तालुक्यात पावसाअभावी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी रब्बी हंगामात गव्हाचा पेरा 162 हेक्टर क्षेत्रात कमी झाला आहे. पाण्याअभावी गव्हाच्या एकूण उत्पादनात घट होणार आहे.

– अनिल दुरगुडे, मंडल कृषी अधिकारी

हेही वाचा

SCROLL FOR NEXT