पुणे

पुणे : आमचं आधीच ठरलं होतं; कुणी काय सांभाळायचं..! प्रतिभा धंगेकर यांची प्रतिक्रिया

अमृता चौगुले

पुणे : अनेकदा घर -संसार, राजकारण सांभाळताना अडचणी येतात. पण आम्हाला अशी अडचण आली नाही. आमचं आधीच ठरलेलं होतं, मी घर- कुटुंब सांभाळणार आणि ते समाजकारण, राजकारण आणि जनतेला सांभाळणार..! येथून पुढेही आमच्या घरात अशाच पध्दतीने काम सुरू राहील, असे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा यांनी दै.'पुढारी'ला सांगितले.

दै.'पुढारी'च्या प्रतिनिधीने गुरुवारी रवींद्र धंगेकर यांच्या विजयानंतर प्रतिभा यांच्याशी संवाद साधला. हा विजय जनतेचा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांची ओळख कामाचा माणूस म्हणून आहे, त्यामुळे ते नेहमी जनतेची कामे करण्याला प्राधान्य देतात, याचा आम्हाला आनंद आहे, असे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, 'आमचे 11 जणांचे कुटुंब आहे. आम्ही शिवाजीनगर तोफखाना येथे राहतो.

आमच्या कुटुंबीयांचीदेखील आम्हाला नेहमीच खूप मदत असते. त्यासोबतच त्यांचा मित्रपरिवार आणि जनतेचे मिळालेले आशीर्वाद यामुळे हा विजय झाला. त्यांना समाजकारण, लोकांना मदत करत असताना आम्ही कधीही अडवणूक करत नाही. उलट, आम्ही सर्व कुटुंबीय त्यांच्या सोबत मिळून काम करण्यातच आमचे समाधान मानतो.'

…म्हणून झाला विजय
सध्याच्या काळात साधा नगरसेवक झाला तरी मोठ्या अलिशान बंगल्यात ते राहतात. दिमतीला सात-आठ अलिशान गाड्या असतात. मात्र, अतिशय साधेपणात तोफखाना येथे एका जुन्या इमारतीमध्ये राहणार्‍या धंगेकर यांनी अनेकदा निवडणूक लढवली. त्यांना अनेक पराभव सहन करावे लागले. मात्र, त्यांनी आपला साधेपणा आणि जनतेचे काम करण्याची वृत्ती कधीच सोडली नाही. त्यामुळेच त्यांचा पोटनिवडणुकीत दणदणीत विजय झाला आहे, असे मत अनेकांनी या वेळी व्यक्त केले.

पूर्वीचे मिळालेल्या धक्क्यात ते दुसर्‍याच दिवशी सावरले…
त्यांना यापूर्वीच्या निवडणुका लढताना अनेकदा पराभव सहन करावा लागला. त्या वेळी आम्हालाही दु:ख झाले. परंतु, ते पराभवाचे दु:ख एका दिवसातच विसरून दुसर्‍या दिवशी सावरत आणि लोकांच्या कामाला लागत. दारावर येणार्‍या प्रत्येकाची कामे करत. त्यामुळे अनेकांचे आम्हाला आशीर्वाद मिळाले अन् त्यांचा विजय झाला, असे प्रतिभा धंगेकर म्हणाल्या.

आता त्यांना 'मंत्रि'पदावर पाहण्याची इच्छा
धंगेकर यांच्या विजयाबाबत विचारल्यावर त्या म्हणाल्या, 'त्यांनी जनतेची खूप कामे केली आहेत. मला त्यांना आमदार झालेले पाहायची इच्छा होती. ती आता पूर्ण झाली आहे. यापुढे त्यांना मंत्री म्हणून पाहायची इच्छा आहे.'

फुगड्या घालून व्यक्त केला आनंद
रवींद्र धंगेकर यांच्या विजयानंतर संपूर्ण शहरासह देशभरात ठिकठिकाणी जल्लोष होत आहे. त्यांचे कार्यकर्ते, महाविकास आघाडीचे पदाधिकारी जल्लोष करत आहेत. असाच जल्लोष धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांनी केला. त्यांनी कसबा गणपती मंदिरासमोर फुगड्या घालून, गुलाल खेळून विजयाचा आनंद व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT