जुन्नर: हलालच्या नावावर मोठी अर्थव्यवस्था उभी केली जात असून, हाच पैसा लव्ह जिहादसाठी वापरला जातो. ज्यामध्ये हिंदू माता-भगिनींचे आयुष्य खराब केले जाते. बजरंग दल, विश्व हिंदू परीषद यासंदर्भात राज्यभर आंदोलन करत आहेत. हिंदू समाजाची भावना आहे की, औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात नको. ही भावना प्रत्येकाला कळाली पाहिजे म्हणून राज्यभर आंदोलन होत आहे, असे प्रतिपादन राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकासमंत्री नितेश राणे यांनी केले.
शिवनेरी स्मारक समिती पुणे व शिवजयंती उत्सव समिती जुन्नर यांच्या वतीने तिथीनुसार सोमवारी (दि. 17) साजरी करण्यात येणार्या शिवजयंती उत्सवाप्रसंगी किल्ले शिवनेरी गडावरील शिवकुंज स्मारकासमोर मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर आयोजित धर्मसभेमध्ये राणे बोलत होते.
या वेळी मंत्री राणे म्हणाले, ब्रिटिशांनी हिंदू सेनापती म्हणून छत्रपती शिवरायांचा उल्लेख केला आहे. छत्रपती शिवराय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते. शिवरायांच्या सेवेत चार-पाच मुस्लिम असतील परंतु शिवरायांच्या सैन्यात एकही मुसलमान नव्हता असा दावा या वेळी राणे यांनी केला. शिवरायांना सेक्युलर राजा म्हणून ओळख देण्याचे ब्रिगेडी लोकांचे प्रयत्न सुरू आहेत. शिवभक्तांनी ते प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत.
ब्रिटिशांनी देखील शिवरायांचा उल्लेख हिंदू सेनापती असा केला आहे. आदिलशहाने अफजलखानास शिवरायांवर आक्रमण करण्यास पाठवले असताना काढलेल्या फर्मानामध्ये शिवरायांमुळे इस्लाम धर्माची वाढ खुंटली आहे, असा उल्लेख असल्याचा दावा या वेळी मंत्री राणे यांनी केला.
या वेळी आमदार शरद सोनवणे, विद्यावाचस्पती नंदकिशोर एकबोटे, शिवव्याख्याते सौरभ कर्डे, शिवनेरी स्मारक समितीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, कार्याध्यक्ष मधुकर काजळे, सचिव रमेश कर्पे, संदीप ताजणे, भाजप तालुकाध्यक्ष संतोषनाना खैरे, गणेश कवडे, अरुण कबाडी आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. या वेळी संत श्री तुकाराम महाराज देहू संस्थानाच्या वतीने संत तुकाराम महाराजांचे महावस्त्र छत्रपती शिवराय यांना अर्पण करण्यात आले आणि पारंपरिक पोवाडे गायले गेले.
पुढे बोलताना आमदार शरद सोनवणे म्हणाले,19 फेब्रुवारीच्या शिवजयंतीला शासनाचा निधी मिळतो, त्याचप्रमाणे तिथीप्रमाणे साजरी करण्यात येणार्या शिवजयंतीसाठी देखील निधी मिळावा अशी मागणी केली. प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिवनेरी स्मारक समितीचे कार्याध्यक्ष मधुकर काजळे यांनी केले तर आभार सचिव रमेश कर्पे यांनी मानले.