पुणे

बटाटा पिकाला टँकरने पाणी ; पाणीटंचाईत पीक वाचविण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड

अमृता चौगुले

पारगाव : पुढारी वृत्तसेवा :  आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात पाणीटंचाईचा फटका बटाटा पिकाला बसू लागला आहे, त्यामुळे बटाटा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत. थोरांदळे गावातील शेतकर्‍यांनी बटाटा पीक वाचविण्यासाठी आता टँकरने पाणी आणून पिकाला देण्यास सुरुवात केली आहे. थोरांदळे परिसरातील शेतकरी बटाटा पीक मोठ्या प्रमाणावर घेतात. यंदा या परिसरात पावसाने समाधानकारक हजेरी लावलीच नाही. जून, जुलै, ऑगस्ट हे तीन महिने कोरडे गेले. त्यामुळे सध्या या परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका बटाटा पिकाला बसला आहे. अनेक शेतकर्‍यांनी लागवड केलेले बटाट्याचे पीक सध्या एक महिन्याचे झाले आहे. परंतु, आता खरी गरज असताना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने शेतकर्‍यांनी चिंता व्यक्त केली आहे.
येथील बाळासाहेब राजगुरू व रमेश घायतडके या शेतकर्‍यांनी तर थेट टँकरने पाणी आणून बटाटा पिकाला देण्यास सुरुवात केली आहे.
बटाटा पिकाला सुरुवातीपासूनच पाण्याचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये जोरदार पावसाची गरज आहे. जर पाऊस पडला नाही तर बटाटा पिकाला पाण्याचा प्रचंड ताण बसून बटाट्याच्या उत्पादनात प्रचंड घट होईल, असे शेतकरी राजगुरू व घायतडके यांनी सांगितले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT