नारायणगाव : कुकडी प्रकल्पात अवघा 10.64 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. प्रकल्पाच्या येडगाव धरणातून 20 मे पासून 1400 क्युसेकने जामखेड, करमाळा, कर्जत, श्रीगोंदा, पारनेर या नगर जिल्ह्यातील तालुक्यांसाठी व जुन्नर तालुक्यासाठी पाणी सोडण्यात यावे असे अहिल्यानगर येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हे आवर्तन फक्त पिण्याच्या पाण्यासाठी सोडले जाणार आहे.
वडज धरणातून नारायणगाव येथून मीना शाखा कालव्यातून बुधवारी (ता. ७) सकाळी ८ वाजल्यापासून ४०० क्युसेकने पाणी सोडले जाणार आहे. हे पाणी शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी पर्यंत जाणार आहे. हे आवर्तन 12 ते 13 दिवसांचे आहे.
डिंभे धरणातून घोड शाखा कालव्याला पाणी सोडले जाणार आहे. या पाण्याचा उपयोग आंबेगाव तालुक्यातील नागापूर, थोरंदाळे, रांजणी,वळती, मांजरवाडी, जवळे या गावांना होणार आहे. या कालव्यामध्ये पाणी सोडावे यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. कालव्यात पाणी सोडावे यासाठी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र दिले होते.
दरम्यान, वडज धरणातून मीनापूरक शाखा कालव्यातही आवर्तन सोडले जाणार आहे. सध्या कुकडी प्रकल्पात अवघा 10.64 टक्के पाणीसाठा आहे. येडगाव धरणात 34.96 तर माणिकडोह धरणात अवघा 4.43 टक्के पाणी साठा आहे. वडज धरणात 26.58 टक्के तर पिंपळगाव जोगे धरणात 4.78 टक्के साठा आहे. डिंभे धरणात 12.25 टक्के पाणी साठा आहे.