पाटस(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पुणे जिह्यातील बारामती, दौंड आणि पुरंदर तालुक्यातील अवर्षणप्रवण क्षेत्रातील शेतजमिनीला पाणीपुरवठा करणार्या जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेतून पाण्याची चोरी केली जात असल्याचा प्रकार दौंड तालुक्यातील पडवी गावात उघडकीस आला आहे. योजनेच्या जलवाहिनीचा व्हॉल्व चालू करून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती करून ते पुढे काही व्यावसायिकांकडून वीजपंपाद्वारे पाणी उचलले जात आहे. यामध्ये व्यावसायिक व योजनेचे संबंधित अधिकारी यांचे संगनमत असल्याच्या चर्चा परिसरात सुरू आहेत.
वरवंड (ता. दौंड) येथील तलावावरून जनाई-शिरसाई योजनेची पाण्याची जलवाहिनी माळवाडी, पडवी व सुपे येथील मयूरेश्वर अभयारण्यातून गेली आहे. या योजनेतून शेतकरी पैसे भरून पाणी घेत आहेत. मात्र, काही व्यावसायिकांनी जलवाहिनीमधून चोरून पाणी मिळविण्यासाठी योजनेच्या संबंधित अधिकार्याच्या मदतीने वेगळी शक्कल लढवली आहे.
जलवाहिनीवर ठिकठिकाणी असणारे एअर व्हॉल्व ढिले करून त्यातून पाणी बाहेर पाडले जात आहे. हे पाणी दिसू नये म्हणून त्याला ताडपत्रीच्या साह्याने झाकले आहे. जलवाहिनीमधून खाली पडलेले पाणी वीजपंपाने उपसले जात आहे. या वीजपंपांचे पाइप हे जमिनीखाली गाडून नेण्यात आले आहेत. यासाठी कायमची केबल व जलवाहिनी टाकण्यात आली आहे.
या प्रकाराला कित्येक दिवस झाले आहेत. मात्र, संबंधित अधिकारी याप्रकरणी कोणतीही कारवाई करीत नाहीत. आम्हाला विकत देखील पाणी मिळत नाही. मात्र, व्यावसायिकांना 24 तास 2 ते 5 एचपी वीजपंपाने पाणी मिळत आहे, असा आरोप शेतकर्यांनी केला आहे. यामागे अधिकारी आणि व्यावसायिक यांचे नक्की काय गौडबंगाल आहे? याबाबत परिसरात चर्चा रंगल्या आहेत. वरिष्ठ अधिकार्यांनी या पाणीचोरीकडे लक्ष द्यावे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. त्यामुळे पाणी चोरणार्या व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरीवर्गाने केली आहे.