पुणे

वडगाव शेरी येथील टँकर भरणा केंद्रावरच पाणी चोरी ?

अमृता चौगुले

येरवडा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : वडगाव शेरी येथील टँकर भरणा केंद्रावरून दररोज शंभरहून अधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, या ठिकाणी महापालिकेकडील चलनाचा पास दाखवून टँकर लंपास केले जात असल्याचे चित्र समोर आले आहे. या टँकर भरणा केंद्रावर दिवसाढवळ्या होणार्‍या पाण्याच्या चोरीची चौकशी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

वडगाव शेरी टँकर केंद्रावरून सोमवारी (दि. 24) 110, तर मंगळवारी (दि. 25) 104 टँकर भरून गेल्याची नोंद रजिस्टरला कर्मचार्‍यांनी केली आहे. यापैकी महापालिकेकडे चलन भरून सुमारे 50 टँकर पास जमा करून भरून नेण्यात आले आहेत. तर उर्वरित टँकर हे टेंडर व महापालिकेकडील खात्याचे भरून गेल्याचे कर्मचार्‍यांनी सांगितले. मात्र, या व्यतिरिक्तही टँकर माफिया कर्मचार्‍यांशी संगनमत करून टँकर भरून नेत आहेत.

कोणी जर विचारणा केली, तर पास दाखवला जातो; अन्यथा कर्मचार्‍यांशी आर्थिक व्यवहार करून टँकर भरून नेले जात आहेत. यासाठी प्रत्येक टँकरचा दर कर्मचार्‍यांनी ठरवून घेतले आहेत. याशिवाय ज्यांचे टेंडर आहेत, तेदेखील टेंडरच्या नावाखाली खासगी सोसायटी, हॉटेल, कॉलेज, बांधकाम साईट आणि मनपा हद्दीबाहेर महापालिकेचे पाणी चढ्या भावाने विकत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

यावर्षी कमी पाऊस होण्याचा अंदाज असल्याने महापालिककडून आगामी दिवसात पाणीकपात होण्याची शक्यता आहे. मात्र, टँकर केंद्रावरून दिवसाढवळ्या होणार्‍या पाणी चोरीवर अंकुश ठेवण्यास महापालिका अधिकारी अपयशी ठरत असल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे. टँकर केंद्रावरून होणारी पाणी चोरी रोखण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

सीसीटीव्ही यंत्रणा बंद

टँकर केंद्रावर पंपिंग स्टेशनचे बांधकाम सुरू असल्याने या ठिकाणाचे सीसीटीव्ही यंत्रणा बंद आहे. कोणत्याही टँकरमध्ये जीपीएस यंत्रणा नाही. याशिवाय किती टँकर भरून गेले, किती आले हे पाहण्यासाठी कोणतीही ठोस यंत्रणा नाही. दहा वर्षांपुढील जुन्या टँकरमध्ये पाणी भरण्यास मनाई असतानादेखील त्यामध्ये पाणी भरून नेले जात आहे.

पंपिंग स्टेशनचे काम सुरू असल्याने सीसीटीव्ही बंद आहेत. मात्र, फ्लो मीटर सुरू असून, त्याद्वारे दररोजचे मीटर रिडींग घेतले जाते. यात किती टँकर भरले गेले त्याची माहिती मिळते. पासद्वारे, तसेच टेंडरद्वारे टँकर कुठे जातात त्याची माहितीही नियमित ठेवली
जात आहे.

                          – नितीन जाधव, कनिष्ठ अभियंता, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT