Pune Water Tanker (File Photo)
पुणे

Pune Water Tanker: पाण्याच्या तीन टाक्यांना ‌‘खो‌’ बसणार नाही, याची काळजी घ्या! कोंढवा भागातील नागरिकांना धास्ती

टँकर अपघातानंतर पोलिस व महापालिका अधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीत काढला तोडगा

पुढारी वृत्तसेवा

सुरेश मोरे

कोंढवा: टँकर अपघाताचे वाढते प्रमाण आणि दररोजची होणारी वाहतूक कोंडी, यावर उपाययोजना म्हणून महापालिका प्रशासन पाणीटंचाई असणाऱ्या भागात पाण्याच्या तीन टाक्या बांधणार आहे.

या योग्य ठिकाणी बांधण्यात याव्यात. अन्यथा, व्यवसाय संपेल किंवा डुबेल, या भीतीपोटी या टाक्यांना ‌‘खो‌’सुद्धा बसू शकतो. कारण, काही प्रतिनिधी व राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा पाणी टँकर व्यवसाय आहे, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

निष्पाप लोकांचे बळी परत जाणार नाहीत, यासाठी नियमांचे काटेकोर पालन करत पालिका प्रशासनाने पाण्याच्या टाक्या बांधाव्यात, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

दक्षिण पुणे शहरातील वाढती पाणीटंचाई, भरधाव टँकरने होणारे अपघात या नागरी समस्यांच्या पार्श्वभूमीवर कोंढवा खुर्द पोलिस ठाण्यात नुकतीच सर्वसमावेशक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी लोकांनी आपल्या भूमिका मांडल्या व पोलिस, महापालिका प्रशासनाने याला उत्तरे दिली. मात्र, बैठक पार पडल्यानंतर बाहेर पडताना लोकांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह पाहायला मिळत होते.

एका निष्पाप नॅशनल फुटबॉलपटू आरिज शेख याचा टँकर खाली चिरडून मृत्यू झाला. बिशेप स्कूलचे विद्यार्थी, शिक्षक, तसेच परिसरातील नागरिक हळहळले. शेख याचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. हा एकच बळी नाही, तर टँकरचालकांनी याअगोदर अनेक लोकांचा बळी घेतला आहे.

मात्र, आरिजच्या जाण्याने परिसरातील सर्व नागरिक आक्रमक झाले आहेत. यापुढे एकही बळी टँकरखाली जाणार नाही, यासाठी लोक एकवटले. प्रशासनासोबत महत्त्वपूर्ण बैठक घेऊन आपल्या तक्रारीवजा मागण्या मांडल्या. यामध्ये राज सिंग, शमिम हासिमखान पठाण, छबिल पटेल, अशोक मेंडाळे, शहनवाज शेख यांनी पुढाकार घेतला.

टँकर कमी व्हावेत, हा हेतू समोर ठेवून महापालिका प्रशासन पाण्याच्या तीन टाक्या बांधणार आहे. कोंढवा, पिसोळी, उंड्री, वडाचीवाडी, होळकरवाडी, औताडवाडी, महंमदवाडी या परिसरात वर्षभर पाणीटंचाई पाहायला मिळते.

एवढ्या गावांना, वाड्या-वस्त्यांना पाणी पुरेल का? कारण किती क्षमतेच्या टाक्या बांधल्या जाणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. जास्तीत जास्त टँकर उंड्री परिसरात जातात. तीन टाक्या नेमक्या कुठे उभारणार याची संपूर्ण चाचपणी करून उभाराव्यात. शिवाय, स्थानिक नागरिकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे.

संबंधित गावांमध्ये दररोज पालिकेच्या जवळपास तीनशे टँकरनी पाणीपुरवठा केला जातो. मग खासगी टँकरची संख्या दुप्पटी, तिप्पटीने असावी किंवा त्यापेक्षा जास्तच, पण कमी नाही. पाण्याच्या टँकर व्यवसायामध्ये राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते शिवाय काही लोकप्रतिनिधी आहेत. व्यवसाय बुडेल किंवा त्याचे प्रमाण कमी होईल.

यासाठी यातील काहीजण टाक्यांना ‌‘खो‌’ घालू शकतात, अशी भीती नागरिकांमधून व्यक्त होऊ लागली आहे. महापालिका प्रशासनाने लोकांना दिलेला शब्द काटेकोरपणे पाळावा व बळी गेलेल्या निष्पाप लोकांना या कामातून आदरांजली वहावी, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.

पाणी मुरतंय कुठे?

अनधिकृत नळजोडणीमुळे कोंढवा खुर्दमध्ये महापालिकेच्या टँकरना अधिक मागणी आहे. मोठ्या प्रमाणात झालेली व होत असलेली अनधिकृत बांधकामे यांना देखील पालिकेचे पाणी वापरले जाते, असे नागरिक सांगतात. काही ठिकाणी टँकर जाऊच शकत नाहीत. म्हणू खरं पाणी मुरतंय कुठे, याचा शोध पालिका प्रशासनाने घ्यावा. बोअरवेलमध्ये पालिकेचे पाणी सोडले जात आहे. शोधा म्हणजे सापडेल, तहानेने व्याकूळ झालेल्या लोकांना आपोआपच पाणी मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT