11 गावांना टँकरची चाहूल File Photo
पुणे

समाविष्ट गावांचा पाणीपुरवठा ‘टँकरभरोसे’; दररोज 850 टँकरची गरज

निधीअभावी आराखडे कागदावर

पुढारी वृत्तसेवा

पुणे : महापालिकेत समावेश होऊनही 34 गावांचा पाण्याचा प्रश्न सुटू शकलेला नाही. 11 गावांचा समावेश होऊन सात वर्षे आणि 23 गावांचा समावेश तीन वर्षे उलटूनही या गावांना अद्यापही टँकरमधूनच पाणीपुरवठा करावा लागत आहे. तब्बल साडेआठशे टँकर पाणी या गावांना महापालिकेकडून दररोज पुरविले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

महापालिकेत समाविष्ट गावांमधील प्रामुख्याने सिंहगड रस्ता परिसरातील गावांमध्ये विहीर आणि तलांवामधून दूषित पाणीपुरवठा झाल्याने जीबीएसची साथ पसरल्याचे समोर आले. त्यामुळे आता सर्वच समाविष्ट गावांच्या शुद्ध पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र, महापालिकेत येऊनही चार ते पाच गावांचा अपवाद वगळता उर्वरित गावांना पाण्यासाठी वणवणच करावी लागता असल्याचे महापालिकेकडून देण्यात आलेल्या माहितीवरून समोर आले आहे. या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी सविस्तर प्रकल्प आराखडे तयार करण्यात आले असले तरी निधीची कमतरता आणि त्यासाठी आवश्यक पाणी कोटा जलसंपदाकडून मंजूर होत नसल्याने हे आराखडे कागदावरच आहेत. त्यामुळे या गावांना पाण्यासाठी टँकरवरच अंवलबून रहावे लागत आहे.

आंबेगाव खुर्द व बुद्रुक : जुन्या हद्दीलगतच्या या गावांना काही प्रमाणात जलवाहिन्या विकसित करून पालिकेकडून पाणीपुरवठा होत आहे. या व्यतिरिक्त दररोज 140 टँकर खेपांद्वारे देखील पाणीपुरवठा करावा लागत आहे.

धायरी : या ठिकाणी 5 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारून काही प्रमाणात जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. याशिवाय नव्याने टँकर पॉइंट तयार करून 85 टँकर खेपाद्वारे (रॉ वाटर) पाणीपुरवठा करीत आहे.

शिवणे, शिवणे- उत्तमनगर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) योजनेतून बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्यांमधून पाणीपुरवठा होतो. याशिवाय वारजे जलकेंद्रातून 1 एमएलडी पाणीपुरवठा होतो. तसेच 5 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

लोहगाव : येथील जुन्या संपवेलमधून पूर्वीप्रमाणेच काही भागास पूर्वीप्रमाणे पाणीपुरवठा होत आहे. तसेच भामा आसखेड प्रकल्पामधून येथील 40 टक्के भागास पाणीपुरवठा करण्यासाठी टाकीचे काम सुरू आहे. याशिवाय दररोज 12 टँकरने पाणी पुरविण्यात येते.

उंड्री : गावांच्या अस्तित्वातील टाकीमध्ये दररोज सुमारे 15 टँकर खेपा पाणीपुरवठा होतो. तसेच 60 टँकर खेपाद्वारे सोसायट्यांमध्ये रोटेशन पद्धतीने पाणीपुरवठा होतो.

फुरसुंगी व उरुळी देवाची : कचरा डेपोने बाधित असलेल्या या गावांना महापालिकेत समाविष्ट होण्यापूर्वीपासून टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच या गावांना 200 टँकर खेपांद्वारे पाणी पुरविण्यात येते. ही गावे महापालिकेतून वगळण्यात आलेली आहेत.

मुंढवा- केशवनगर : या गावांना पूर्वीप्रमाणेच रामटेकडी टाकीवरून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. काही भागात पाण्याच्या लाइन टाकण्यात आलेल्या आहेत. याशिवाय आवश्यकतेनुसार 24 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

हडपसर- साडेसतरानळी : काही भागात रामटेकडी येथील टाकीवरून तर काही भागात बोअरवेलमार्फत साठवण टाकीद्वारे पाणीपुरवठा होतो. याशिवाय 5 टँकर दररोज सुरू आहेत.

सूस : 75 हजार लिटरच्या संपवेलमध्ये पालिकेकडून पाणीपुरवठा होतो. या गावांत घरोघरी पाणीपुरवठ्याची सोय असून विविध ठिकाणी बसविण्यात आलेल्या सिंटेक्स टाक्यांमध्ये 30 टँकरने दररोज पाणीपुरवठा होतो.

म्हाळुंगे : विविध ठिकाणच्या सिंटेक्स टाक्यांमध्ये 50 टँकरने खेपाद्वारे पाणीपुरवठा होतो.

बावधन : गावाच्या 3 संपवेलमध्ये पाणीपुरवठा करण्यात येतो.

कोंढवे, धावडे, कोपरे : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेमध्ये सद्य:स्थितीत पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

खडकवासला : महापालिकेच्या तीन हजार मि.मी. लाइनमधून विहिरीमध्ये पाणी घेऊन ईएसआर टाकीद्वारे गावठाण भागाला पाणीपुरवठा करण्यात येतो. ही योजना पालिकेमार्फत मार्फत सुरू ठेवण्यात आली आहे.

नांदेड, किरकटवाडी, नांदोशी, सणसनगर : विहिरीमध्ये पाणी घेऊन पम्पिंगद्वारे प्रत्येक गावामधील टाक्यांमध्ये पाणी घेऊन पाणीपुरवठा करण्यात येतो.

मांगडेवाडी, कोळेवाडी : अस्तित्वातील विहिरी व तळ्यामधून टाक्यांमध्ये पाणीपुरवठा करण्यात येतो व टाक्यांमधून गावात पाणीपुरवठा करण्यात येतो. सिंटेक्स टाक्या बसविल्या असून 26 टँकरमधून खेपांद्वारे दैनंदिन पाणीपुरवठा होतो.

गुजर, निंबाळकरवाडी, भिलारेवाडी : अस्तित्वातील विहिरी व तळ्यामधून टाक्यांमध्ये पाणीपुरवठा करण्यात येतो व टाक्यांमधून गावात पाणीपुरवठा करण्यात येतो. सिंटेक्स टाक्या बसविल्या असून 26 टँकरमधून खेपांद्वारे दैनंदिन पाणीपुरवठा होतो

नर्‍हे : बुस्टर पम्पाद्वारे टाक्यांमध्ये पाणीपुरवठा घेऊन (5 टाक्या) गावामध्ये पाणीपुरवठा करण्यात येतो. तसेच, 5 टँकर खेपांद्वारे पाणीपुरवठा होतो.

पिसोळी : 1.5 लाख लीटर टाकीमध्ये पालिकेकडून या गावामध्ये दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. सिंटेक्स टाक्या बसविल्या असून 38 टँकर सुरू आहे.

जांभूळवाडी : विहिरीमधून पम्पिंगद्वारे टाक्यांमध्ये पाणी घेऊन गावठाण भागला पाणीपुरवठा करण्यात येतो. सिंटेक्स टाक्या बसविल्या असून एक टँकर सुरू आहे.

वडाचीवाडी : तळ्यामधून पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी घेऊन पाणीपुरवठा करण्यात येतो. संपवेलमध्ये 9 टँकरमधून पाणी पुरवठा होतो.

औताडे हांडेवाडी : विहिरीतून पाणी घेऊन गावठाण भागात पाणीपुरवठा केला जातो. याशिवाय 16 टँकरमधून देखील पाणी पुरविण्यात येते.

शेवाळेवाडी : विहिरीमधून पम्पिंगद्वारे गावठाण भागात पाणीपुरवठा केला जातो. तसेच 42 सिंटेक्स टाक्यांमध्ये दररोज 40 टँकर खेपांद्वारे देखील पाणी पुरविण्यात येते.

वाघोली : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्लांटमधून या गावात पाणीपुरवठा केला जातो. 5 हजार लिटरच्या 14 सिंटेक्स टाक्या बसविल्या असून 6 टँकर खेपांद्वारे पाणीपुरवठा होतो.

मांजरी बु. : या गावांमध्ये 30 टँकर खेपांद्वारे देखील पाणी पुरविण्यात येते. तसेच 12 एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र बांधण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

होळकरवाडी: विहिरीमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. याशिवाय दररोज 18 टँकर खेपांद्वारे देखील पाणी पुरविण्यात येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT