Dam Water Storage | धरणांतील साठा ८० टक्क्यांच्या उंबरठ्यावर  
पुणे

Dam Water Storage | धरणांतील साठा ८० टक्क्यांच्या उंबरठ्यावर

मराठवाड्यावर टंचाईचे सावट; राज्यातील २२ धरणे अद्याप कोरडी

पुढारी वृत्तसेवा

पुणे : राज्यातील धरणांमधील एकूण पाणीसाठ्याने ८० टक्क्यांच्या उंबरठ्यावर मजल मारली असली, तरी विभागनिहाय पाणीसाठ्यात मोठी तफावत कायम आहे. राज्यातील सर्व धरणांचा एकत्रित उपयुक्त पाणीसाठा ३८,०७७.६० दशलक्ष घनमीटर असून, उपलब्ध पाणीसाठ्याची टक्केवारी ७४ टक्के आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा साठा ७९.०८ टक्के होता. त्यामुळे यंदा गतवर्षीच्या तुलनेत ५ टक्क्यांनी पाणीसाठा कमी आहे. दरम्यान, मराठवाड्यावर टंचाईचे सावट असून, राज्यातील २२ धरणे अद्याप कोरडी आहेत.

विभागनिहाय पाणीसाठ्याचा विचार करता कोकण विभागाने सर्वाधिक ८९.५३ टक्के पाणीसाठा राखला आहे. त्याखालोखाल पुणे विभागात ८७.९४ टक्के, नाशिक विभागात ७७.५३ टक्के साठा आहे. मात्र, अमरावती विभागात ६१.९५ टक्के, नागपूर विभागात ५९.७९ टक्के, तर छत्रपती संभाजीनगर विभागात अवघा ४९.८७ टक्के पाणीसाठा आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाची स्थिती विशेष चिंतेची आहे. गतवर्षी याच कालावधीत या विभागातील धरणांमध्ये ६९.०३ टक्के पाणीसाठा होता. यंदा तो ४९.८७ टक्क्यांवर आला आहे.

३६ धरणे शंभर टक्के भरली

एकीकडे, काही धरणांमध्ये पाण्याची कमतरता असताना राज्यातील ३६ धरणे शंभर टक्के भरली आहेत. उर्वरित धरणांमध्ये पाणीसाठा ५ ते ९५ टक्क्यांदरम्यान आहे. त्यामुळे राज्याचा सरासरी साठा समाधानकारक दिसत असला, तरी विभागनिहाय असमतोल स्पष्टपणे जाणवत आहे.

गतवर्षीपेक्षा राज्याचा साठा कमी

राज्यातील एकूण पाणीसाठा यंदा ७४ टक्के असून, गतवर्षी तो ७९.०८ टक्के होता. कोकण व नाशिक विभागात यंदाचा साठा गतवर्षीच्या तुलनेत तुलनेने चांगला आहे. मात्र, नागपूरसह अमरावती आणि विशेषतः छत्रपती संभाजीनगर विभागात गतवर्षीपेक्षा मोठी घट झाली आहे. पुणे आणि कोकण विभागात गतवर्षीच्या तुलनेत किरकोळ घट नोंदविण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT