शिक्रापूर : यंदा मे महिन्यामध्ये सुरू असलेल्या पावसाने धुमाकुळ घातला आहे. या पावसामुळे निसर्गाचा चमत्कारही अनुभवता येत असून धामरी (ता. शिरूर) येथील एका शेतकऱ्याच्या बोअरवेलमधून ४० फूट पाण्याचा उंच फवारा उडत आहे. बोअरवेलमधून उठणारा हा पाण्याचा फवारा बघण्यासाठी धामारी व परिसरातील गावांमधून नागरिक आवर्जून जात आहे.
धामरी येथील डफळापुर या वस्तीचे नागरिक अरुण बबन डफळ यांनी शेतामध्ये बोअरवेल घेतला आहे. सातत्याने तीन दिवसापासून पावसाने थैमान घातले असून निसर्गाने येथे वेगळाच चमत्कार घडवला आहे. अरुण डफळ यांच्या बोअरवेलमधून सुमारे ४० फुट उंचीपर्यंत पाण्याचे फवारे येथे उडत आहेत. जोरदार झालेल्या पावसाच्या दबावामुळे हा फवारा उडत असल्याची शक्यता येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. तसेच यामागे काही वैज्ञानिक कारण आहे का याबाबतही येथील नागरिकांमध्ये कुतूहल व्यक्त केले जात आहे.