कात्रज; पुढारी वृत्तसेवा : कात्रज येथील संतोषनगर भागाला राजीव गांधी पंपिंग स्टेशन येथून पाणीपुरवठा केला जातो. पंपिंग स्टेशनच्या विद्युत पंपमध्ये तांत्रिक बिघड झाल्याने या भागात गेल्या चार दिवसांपासून पाणी समस्या उद्भवली आहे. पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांतून महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पाणीपुरवठा व विद्युत विभागाच्या नियोजन शून्य कारभारमुळे ही समस्या निर्माण झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
कात्रज उपनगरात नेहमीच पाणी समस्याला तोंड द्यावे लागत आहे. गेली चार दिवस संतोषनगर, अंजनीनगर, जैन मंदिर परिसर, आगम मंदिर परिसर, वाघजाई नगर आणि दत्तनगरच्या काही भागांत पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे. महापालिकेकडून पाठवण्यात आलेल्या टँकरदेखील नागरिकांची पाण्याची गरज पूर्ण करू शकत नाहीत. टँकर आल्यानंतर पाण्यासाठी त्याभोवती मोठी गर्दी होत आहे.
काही नागरिकांनी स्वतः टँकरद्वारे पाणी विकत घेत आर्थिक भुर्दंड सहन करीत आहे. बुधवारी (दि. 26) झालेल्या बिघाड दुरूस्त करण्यासाठी विद्युत विभागाला चार दिवस लागले. यावरून जीवनावश्यक गरजांच्या देखभाल-दुरुस्तीबाबत मनपा प्रशासन किती गंभीर आहे, हे लक्षात येते. शनिवारी दुपारी दोन वाजता काम पूर्ण करण्यात आले. आता टेस्टिंग आणि पुन्हा उपविभागानुसार पाणीपुरवठा यानुसार संपूर्ण पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी किमान दोन दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे जाणकार नागरिकांनी सांगितले.
संतोषनगर हा सर्वसामान्य नोकरदार, कामगार लोकवस्तीचा भाग आहे. या भागात सातत्याने पाणी समस्या निर्माण होते. नागरिकांनी पोट भरण्यासाठी काम करावे की पाण्याची वाट पाहावी. नागरिकांना खूप त्रास होत असून, हे कुठे तरी थांबायला हवे. पाणीपुरवठा विभागाने योग्य नियोजन करावे; अन्यथा नागरिकांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल.
– राजू कदम, सामाजिक कार्यकर्ते, कात्रजसंतोषनगर भागाला पाणीपुरवठा करणारा राजीव गांधी पंपिंग स्टेशन येथील 1000 एचपी पंप बुधवारी नादुरुस्त झाला. त्यामुळे या भागात पाणी समस्या निर्माण झाली. मात्र, पर्यायी व्यवस्थेद्वारे सपाट भागाला पाणीपुरवठा केला, तर उंच भागात टँकर पाठवले होते. शनिवारी विद्युत विभागाने काम पूर्ण केले. परिसरातील पाणीपुरवठा लवकरच सुरळीत होईल.
– प्रशांत कुंभार, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका