माळेगाव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : एकीकडे बागायती पट्ट्यातील नागरिकांना निरा डावा कालव्यामुळे दिलासा मिळला आहे, तर दुसरीकडे उन्हाच्या तीव्रतेमुळे जिरायत भाग होरपळून निघाला आहे. अशी दोन परस्परविरोधी चित्रं बारामती तालुक्यात सध्या पाहवयास मिळत आहेत. तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकर्यांच्या शेतीला फायदा व्हावा या उद्देशाने अनेक गांवामध्ये कर्हा नदीवर ठिकठिकाणी बंधारे बांधण्यात आले आहे. परंतु, गेल्या काही महिन्यांपूर्वी तुडूंब भरलेल्या या बंधार्यांतील पाणीसाठा वाढत्या उष्णतेमुळे दिवसेंदिवस खालावून नदीचा परिसर ओसाड पडलेला आहे.
या भागात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले असून, विहिरी, कुपनलिका, तलावदेखील आटले आहेत. त्यामुळे पाणीटंचाईसह जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तर पिकेही करपू लागली आहेत. तर दुसरीकडे बागायती पट्ट्यात निरा डाव्या कालव्याला उन्हाळी आवर्तन सुटले असून, जलसाठ्यांना नवसंजीवनी मिळाली आहे. जलसाठ्यांतील पाणीपातळीत वाढ झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून, शेतकर्यांच्या पिकांनाही जीवदान मिळाले आहे. मात्र, काही भागात कालव्यातून पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होत आहे.