पळसदेव : पुढारी वृत्तसेवा : पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यांसाठी वरदान ठरलेल्या उजनी (यशवंत सागर) धरणाचा पाणीसाठा मार्चअखेरीस सोमवारी (दि.1) सकाळी सहा वाजता वजा 36.38 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे धरणावरील सार्वजनिक पाणीपुरवठा योजना ही संकटात आल्या आहेत. जलाशयावरील पाण्यामुळे तीनही जिल्ह्यांतील बागायती क्षेत्र वाढले असले, तरी पिण्याचा पाण्याचा आणि शेतीसिंचनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करीत चालला आहे. यामुळे स्थानिकांची 'धरण उशाला आणि कोरड घशाला', अशी अवस्था झाली आहे.
राज्यातील गोड्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर म्हणून उजनी जलाशयाकडे पाहिले जाते. याच उजनी जलाशयाचा पाणीसाठा इतिहासात पहिल्यांदाच मार्च महिन्यातच वजा 35 टक्क्यांवर पोहोचला आहे. परिणामी, एप्रिल मे महिन्यात भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यातच ऊस, डाळिंब, पेरू, द्राक्ष व इतर उभी पिके हातातोंडाला आली आहेत. तर नवीन ऊस लागवडीही करण्यात आल्या आहेत. त्यांना एरवी 10 ते 15 दिवसांआड पाणी दिले तरी चालत होते. परंतु, आता सूर्य आग ओकत असल्याने पिकांना 4 ते 8 दिवसाला पाणी द्यावे लागत आहे. त्यात विजेचे भारनियमन आणि पाण्याची दुर्बक्षता यामुळे येथील शेतकर्यांना पिके वाचवण्यासाठी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करावी लागत आहे.
तसेच धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने दररोज वीज पंप खाली घेऊन पाण्यातील गाळ काढून फुटबॉल नजीकच्या चारीतील पाण्यात आणून पाण्याचा एक एक थेंब वाचवून तो शेतीपर्यंत नेण्यासाठी शेतकर्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच धरणातील पाण्याचेही बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे या धरणावर अवलंबून असलेल्या शेतीसह विविध गावच्या पाणीपुरवठा योजना, एमआयडीसीच्या योजनाही संकटात येणार आहेत.
हेही वाचा