खडकवासला: उन्हाची तीव्रता वाढल्याने तसेच भीषण वणव्यांमुळे जंगलातील चारा आणि खाद्य नष्ट झाल्याने सिंहगड, पानशेतच्या जंगलातील वन्यजीवांची खाद्य व पाण्यासाठी वणवण सुरू आहे. त्यामुळे सिंहगडच्या जंगलात वन विभागाच्या वतीने वन्यजीवांसाठी विविध ठिकाणी बांधण्यात आलेल्या दहा तळ्यांमध्ये पाण्याची सोय करण्यात आली आहे.
सिंहगड वनसंरक्षक समितीच्या वतीने सिंहगड किल्ल्याच्या पश्चिमेच्या घेरा सिंहगड थोपटेवाडी (ता. हवेली) येथील शिवकालीन काळूबाई जंगलातील दोन तळ्यांत टँकरने पाणी सोडण्यात आले. तसेच, अतकरवाडी येथील वनतळ्यातही टँकरने पाणी सोडले जात आहे. याशिवाय सिंहगड किल्ल्याच्या जंगलात अतकरवाडी, मोरदरी खिंड आदी ठिकाणच्या सात तळ्यांत पाणी सोडले जात आहे.
कडक उन्हामुळे जंगलातील बहुतांश नैसर्गिक झरे, पाणवठे कोरडे पडले आहेत. त्यामुळे पाण्यासाठी मोर, ससे, हरीण, काळवीट आदी वन्यजीव नागरी वस्त्यांतील शेतात, खडकवासला, पानशेत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात धाव घेत आहेत. यामुळे वनविभागाने तळ्यांमध्ये टँकरद्वारे पाणी सोडल्याने वन्यजीवांची सोय झाली आहे.
सिंहगड वन विभागाचे वनपरिमंडळ अधिकारी समाधान पाटील म्हणाले की, वन्यजीवांसाठी वन विभागाने बांधलेल्या तळ्यात सध्या टँकरने पाणी सोडले जात आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांसह पक्ष्यांची तहान भागवली जात आहे. सिंहगडच्या जंगलात बिबट्यासह विविध जातींच्या वन्यप्राण्यांचा, पक्ष्यांचा अधिवास आहे. अनेक प्राणी, पक्षी दुर्मीळ आहेत.
निधी नसल्याने नवीन तळी नाहीत
वन विभागाकडे निधी उपलब्ध नसल्याने यंदाच्या उन्हाळ्यात वन्यजीवांसाठी वनक्षेत्रात नवीन तळी, पाणवठे तयार करण्यात आलेले नाहीत. जंगलातील पाणवठे, जुन्या तळ्यांची स्वच्छता करून त्यात पाणी सोडले जात आहे.
सिंहगडच्या जंगलातील तळ्यात सिंहगड वनसंरक्षक समितीच्या आर्थिक निधीतून पाण्यासाठी खर्च केला जात आहे. सिंहगडच्या जंगलात नवीन वनतळ्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. वन्यजीवांचे पाणी-खाद्याअभावी होणारे हाल पाहून सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याच्या मणेरवाडी येथील युवकांनी परिसरातील जंगलात खाद्य, पाण्याची सोय केली आहे.
सिंहगड परिसरातील वन्यजीवांसाठी बांधण्यात आलेल्या तळ्यात सध्या टँकरने पाणी सोडले जात आहे. आठ-दहा दिवसांपासून त्यात पाणी सोडले जात आहे.-समाधान पाटील, वनपरिमंडळ अधिकारी, सिंहगड वन विभाग
पानशेत वरसगावच्या जंगलातील पाणवठ्यांची साफसफाई करण्यात आली आहे. मात्र, निधी नसल्याने नवीन वनतळी तयार करण्यात आली नाहीत.- वैशाली हाडवळे, वन परिमंडळ अधिकारी, पानशेत