पुणे

पिंपरी शहर फुगले, मात्र पाणी तितकेच; पाण्याच्या स्त्रोत निर्मितीकडे दुर्लक्ष

अमृता चौगुले

मिलिंद कांबळे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या 30 लाखांच्या पुढे पोहोचली आहे. शहरातील चोहोबाजूंना मोठ-मोठे गृहप्रकल्प उभे राहत आहेत. पाण्याची मागणी सातत्याने वाढत असली तरी, महापालिकेकडून पाण्याचे नवे स्त्रोत निर्माण करण्याबरोबरच पाणीसाठा वाढीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. तसेच, पाणी शुद्धीकरण क्षमता वाढविण्याचे कामही संथगतीने सुरू आहे. सांडपाण्याचा पुनर्वापर प्रकल्पही कागदावर आहे. मागणीप्रमाणे पाणी उपलब्ध न झाल्याने भविष्यात शहरात पाणीप्रश्न गंभीर होण्याची दाट शक्यता आहे.

प्रत्येक व्यक्तीस प्रतिदिन 135 लिटर पाण्याची गरज
शहरातील प्रत्येक व्यक्तीस प्रतिदिन 135 लिटर पाण्याची गरज भासते. सध्या पवना धरणातून 510 एमएलडी आणि 'एमआयडीसी'कडून 30 एमएलडी असे एकूण दररोज 540 एमएलडी पाणी शहराला दिले जात आहे. चिखली जलशुद्धीकरण केंद्रातून चाचणीद्वारे दररोज 35 एमएलडी पाणी देण्यास नुकतीच सुरुवात झाली आहे. अनेक हाउसिंग सोसायट्यांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने ओरड कायम आहे.

काही भागात विशेषत: उंचावरील व शहराच्या शेवटच्या टोकावरील परिसरात पुरेसे पाणी येत नसल्याच्या तक्रारी आहेत. बोअरींग तसेच, खासगी टँकरच्या पाण्यावर अनेक हाउसिंग सोसायट्यांना पाण्याची गरज भागवावी लागत आहे. रावेत, किवळे, मामुर्डी, पुनावळे, चर्‍होली, मोशी, वाकड तसेच, एमआयडीसी भागात टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. पाण्याची गरज वाढत आहे.

पवना बंद जलवाहिनी प्रकल्प अर्धवट
पाण्याची वाढती गरज भागविण्यासाठी पालिका प्रशासनाला पाण्याच्या नवीन स्त्रोताचा शोध घेणे आवश्यक आहे. आंद्रा आणि भामा आसखेड धरणातून एकूण 267 एमएलडी पाणी आणण्यासाठी प्रशासनाकडून संथ गतीने हालचाली सुरू आहेत. त्यामुळे ते पाणी शहरात येण्यास किमान चार ते पाच वर्षांचा कालवधी लागू शकतो. पवना बंद जलवाहिनी प्रकल्प अर्धवट स्थितीत पडून आहे.

पाणी साठविण्यासाठी टाक्यांची संख्याही पूर्वीइतकीच आहे. पाणीसाठा वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात नाहीत. निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील शुद्धीकरणाची क्षमता 100 एमएलडीने वाढविण्याचे काम कासवगतीने सुरू आहे. पालिकेच्या सांडपाणी शुद्धीकरण केंद्रांतील (एसटीपी) प्रक्रिया केलेले पाणी वापरण्यास देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या काळात मंजूर झाला होता. तीन वर्षे झाले तरी, तो प्रकल्प अद्याप कागदावरच आहे. तसेच, मोठ्या हाऊसिंग सोसायट्यांत सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यास अल्प प्रतिसाद मिळत आहे. परिणामी, पाण्याची गरज भागविता न आल्याने भविष्यात पाणीप्रश्न अधिक उग्र होण्याची शक्यता आहे.

चिखली केंद्रातून 100 एमएलडी पाण्याची प्रतीक्षा
तात्पुरता उपाय म्हणून तळवडे येथील निघोजे येथून इंद्रायणी नदीवरील बंधार्‍यावरून पाणी उचलून ते चिखली जलशुद्धीकरण केंद्रात आणले आहे. तेथून दररोज 100 एमएलडी पाणी शहराला दिले जाणार आहे. त्यासंदर्भात अद्याप चाचण्या सुरू असल्याने या केंद्रातून 100 एमएलडी पाण्याची प्रतीक्षा कायम आहे. उद्घाटनानंतर हे पाणी मिळेल, असे अधिकारी सांगत आहेत.

आंद्रा, भामा आसखेड प्रकल्पांवर लक्ष असल्याचा दावा
आंद्रा व भामा आसखेड धरणातून 267 एमएलडी पाणी आणण्यासाठी भूमिगत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी ग्रामपंचायत, वन विभाग, पीडब्ल्यूडी, शेतकरी, एमआयडीसी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जलसंपदा विभाग, जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठका घेण्यात येत आहेत. तोडगा काढून जलवाहिनीचे काम केले जात आहे.

आभा आसखेड धरणावर जॅकेवल, पंपिंग स्टेशन, विद्युतविषयक कामांची निविदा अंतिम टप्प्यात आले. तर, आंद्रा धरणावर जॅकेवल उभारणीसाठी जागेचा शोध सुरू आहे. या कामांसदर्भात सातत्याने बैठका घेऊन पाठपुरावा केला जात आहेत. पवना बंद जलवाहिनीचे काम सुरू करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे, असे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी सांगितले.

साडेतीन वर्षांपासून स्मार्ट सिटीला दिवसाआड पाणी
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीला दररोज पाणीपुरवठा करण्याची क्षमता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे नाही. त्यामुळे दोन दिवसांतून एकदा शहरातील अर्ध्या भागास पाणी देण्याची नामुष्की पालिकेवर ओढविली आहे. तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिवसाआड पाणीपुरवठा 25 नोव्हेंबर 2019 ला सुरू केला. तो अद्याप सुरू आहे. त्यास जवळजवळ साडेतीन वर्षे झाले. अद्याप पालिका प्रशासनाला दररोज 24 तास पाणी देण्यात यश मिळालेले नाही. प्रशासनाचा या कारभारावर रोष व्यक्त केला जात आहे.

पिण्याच्या पाण्याने रस्ते, अंगण तसेच, वाहने धुण्याचे प्रमाण शहरात मोठे आहे. तसेच, इमारत व घरावरील पाण्याच्या टाक्या भरून वाहत असतात. बाग व झाडांना पिण्याचे पाणी दिले जाते. काही ठिकाणी बांधकामास पिण्याचे पाणी वापरले जाते. त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होते. अशा बेशिस्त नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा विचार सुरू आहे.
                                             – प्रदीप जांभळे, अतिरिक्त आयुक्त

निगडी येथील सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता 500 वरून 600 एमएलडी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. रावेत अशुद्ध जलउपसा केंद्रात पंपिंगची क्षमता वाढविण्यात आली आहे. चिखली जलशुद्धीकरण केंद्रातून टप्पाटप्पाने 100 एमएलडी पाणीपुरवठा केला जाणार आहे. गळती रोखण्यासोबत अनधिकृत नळजोड अधिकृत करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे .

                                  – श्रीकांत सवणे, विभागप्रमुख, पाणीपुरवठा

लोकसंख्येनुसार सेक्टर 23 येथील पाणी शुद्धीकरणाची क्षमता
वर्ष लोकसंख्या क्षमता
(एमएलडी)
1989 3,76,000 114
1999 9,06,417 228
2006 12,35,000 328
2011 17,29,359 428
2023 30,00,000 480

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT