भवानी पेठ : पुढारी वृत्तसेवा : चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी एल अँड टी कंपनीकडून घोरपडे पेठेत खोदकाम चालू असताना 132 केव्ही केबल तुटल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असतानाच पिण्याच्या पाण्याच्या आठ इंचाच्या वाहिनीत बिघाड झाल्याचे मंगळवारी निदर्शनास आले. पाणीपुरवठा अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी पाहणी केली. याबाबत पुणे मनपा पाणीपुरवठा उपअभियंता अब्दुल्ला खान म्हणाले, 'येथील काही भागांत पाणीपुरवठा होत नाही. एल अँड टी कंपनीने डॉ. विजय कदम चौकात खोदकाम करताना पिण्याच्या पाण्याच्या वाहिनीत बिघाड झाला असून, खोदकाम करून वाहिनी बुजवली आहे. पोकलेनने मुरूम काढल्यानंतर समस्येचे निराकरण होईल.'
पिण्याच्या पाण्याच्या वाहिनीत बिघाड झाल्याने शेकडो लिटर पाणी खोल खड्ड्यात मुरत आहे. परिणामी, या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. गेल्या तीन दिवसांपासून नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.
घोरपडे पेठेतील महाराणा प्रताप रस्ता डॉ. विजय कदम चौक ते मक्का मस्जिद (मोमीनपुरा) येथील रस्त्यावर वाहिन्या टाकण्याचे काम चालू असताना शनिवारी पहाटे शहराला वीजपुरवठा करणारी केबल तुटली होती. ही समस्या सोमवारी विद्युत विभागाच्या लक्षात आली होती. या प्रश्नावर मंगळवारपर्यंत कोणतीही ठोस उपाययोजना झाली नसताना आज दुसर्या दिवशी पाण्याची वाहिनी फुटल्याचे निदर्शनास
आल्याने प्रश्न सुटण्याऐवजी गुंतागुंत निर्माण होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.