Dhayari Water Issue: धायरी परिसराचा महापालिकेत समावेश होऊनही या भागातील हजारो नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाणीटंचाईमुळे खासगी टँकरची मागणी दुपटीने वाढली आहे. सोसायटी, लोकवस्त्यांतील रहिवाशांना टँकरसाठी दरमहा हजारो रुपये द्यावे लागत आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बेनकरवस्ती, रायकरमळा, अंबाईदरा, पोकळेवस्ती, धनगरवस्ती आदी परिसरातील पाणीपुरवठा कोलमडला आहे.
कोट्यवधी रुपये खर्च करूनही प्रचंड लोकसंख्येला पुरेसे पाणी मिळत नाही. अपुर्या, कमी व्यासाच्या जलवाहिन्या, अनियमित व कमी दाबाने पाणी, उंच भागात पाणीटंचाई आदी समस्यांना या भागातील रहिवाशांना तोंड द्यावे लागत आहे. हजारो नागरिक रोजच्या पाणीटंचाईने त्रस्त झाले आहेत.
आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले, ’पाणीपुरवठ्याचा सुधारित आराखडा मंजूर होऊन प्रत्यक्ष काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांना पाणीटंचाईचा समाना करावा लागणार असल्याची चिन्हे आहेत. तोपर्यंत रहिवाशांना पुरेसे पाणी मिळण्यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे. पाणीटंचाई असलेल्या भागात नवीन, तसेच जीर्ण बदलून पुरेशा क्षमतेच्या जलवाहिन्या टाकण्यात याव्यात.
परिसरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर नळकनेक्शन जोडले गेले आहेत. सबलाइन न वापरता डायरेक्ट मेन लाइनवर कनेक्शन घेतली गेली आहेत. ठिकठिकाणी होणार्या गळतीमुळे पाण्याचा अपव्यय होत असल्याने परिसरातील पाणीपुरवठा कोलमडला आहे.
या भागासाठी लवकरच सुधारित पाणीपुरवठा योजन राबविण्यात येणार आहे. सध्या कमी दाबाने व अपुरे पाणी मिळत असलेल्या बेनकरवस्ती भागात नवीन जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. या कामास मंजुरी मिळाली असून, लवकरच काम सुरू होणार आहे. सर्व भागात पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होण्यासाठी अहोरात्र पंपिंग सुरू आहे.- अक्षय गावित, कनिष्ठ अभियंता, धायरी पाणीपुरवठा विभाग