पुणे

मोरगाव : मयूरेश्वरास भाविकांकडून जलाभिषेक

अमृता चौगुले

मोरगाव (ता. बारामती); पुढारी वृत्तसेवा : माघी यात्रेनिमित्त अष्टविनायकातील प्रथम असलेल्या मोरगाव येथील मयूरेश्वरास रविवार (दि. 22) ते गुरुवार (दि. 26) या कालावधीत स्वहस्ते जलाभिषेक करता येणार आहे. या कालावधीत मुक्तद्वारदर्शन व द्वारयात्रा होणार आहे. यानिमित्त रविवारी भाविकांनी मयूरेश्वराच्या मूर्तीस जलाभिषेक करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मुक्तद्वारदर्शन व व्दारयात्रेनिमित्त देवस्थान व ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली आहे. यंदा मोरगाववासीयांना आधार कार्ड दाखवून दर्शनरांगेशिवाय प्रवेश मिळण्याची सोय करण्यात आली आहे. याची वेगळी रांग असून, ग्रामस्थांनी देवस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर व्यवस्थापक राजेंद्र जगताप यांनी केले आहे.

श्री मयूरेश्वराच्या चार दिशांना चतुर्थ पुरुषार्थ आहेत. परंपरेनुसार रविवारी भाविकांनी धर्मव्दार (बाबुर्डी) मार्गावरील देवदेवतांचे विधिवत दर्शन घेऊन मयूरेश्वर मंदिरात प्रवेश केला. उद्या (दि. 23) अर्थव्दार (मुर्टी), दि. 24 कामव्दार (नाझरे क. प.), दि. 25 मोक्षव्दार (वढाणे) या ठिकाणी गणेशभक्त अनवाणी व्दारयात्रा करणार आहेत. या काळात मयूरेश्वरास धार्मिक परंपरेनुसार पूजापाठ केली जाते. भरजरी ऐतिहासिक पोशाख मयूरेश्वरास परिधान केला जातो.

सरपंच अलका तावरे, उपसरपंच नीलेश केदारी, ग्रामपंचायत सदस्य यांचे मार्गदर्शन, वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे स. पो. नि. सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक राजेंद्र जगताप, सुरक्षा पर्यवेक्षक शैलेश गायकवाड, मंदिर कर्मचारी यांनी भाविकांसाठी सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

SCROLL FOR NEXT