भोर; पुढारी वृत्तसेवा: लम्पी स्कीन आजाराचा प्रसार न होण्यासाठी जनावरांचे लसीकरण करा. एकही जनावर यापासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश आमदार संग्राम थोपटे यांनी पशुसंवर्धन विभागास दिले. येथील रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेत गुरुवारी (दि. 15) पशुवैद्यकीय अधिकार्यांसोबत आ. थोपटे यांनी लम्पीबाबत बैठक घेतली. या वेळी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रशांत सोनटक्के, पशुधन विकास अधिकारी डॉ. पौर्णिमा येवतीकर, डॉ. शुभांगी गावकरे, पशुधन विकास अधिकारी डॉ. धुमाळ, डॉ. सचिन काळे उपस्थित होते.
डॉ. सोनटक्के यांनी, बसरापूर, जयतपाड या गावातील शेतकर्यांच्या जनावरांना लम्पी स्कीन हा आजार झाल्याचे आढळून आले. तालुक्यातील 43 हजार 70 पैकी 2 जनावरांना या आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. हा आजार आटोक्यात आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने तातडीने लसीकरण सुरू केले आहे. तालुक्यात 13 हजार लस प्राप्त झाली असून सध्या गाय वर्गातील 5 हजार 500 जनावरांना लसीकरण झाले आहे. प्रत्येक गावातील पशुपालकांनी जनावरांचा गोठा स्वच्छ करून कीटकनाशकांची फवारणी करावी. जनावरांचे लसीकरण करावे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून धुराडीची फवारणी करावी, असे आवाहन आ. थोपटे यांनी केले.