पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मोशी कचरा डेपो येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात 700 टन सुक्या कचर्यापासून 14 मेगा वॅट वीजनिर्मिती केली जाणार आहे. मात्र, सध्या 1.7 मेगा वॅट वीज प्रायोगिक तत्त्वावर तयार केली जात आहे. टप्पाटप्प्याने पूर्ण क्षमतेने सप्टेंबर महिन्यापासून 14 मेगा वॅट वीज निर्माण केली जाणार आहे. शहरातील दररोज 1 हजार 200 टन ओला व सुका कचरा जमा होतो. त्यातील सर्व सुका कचरा वेस्ट टू एनर्जीसाठी दिला जाणार आहे. सुका कचरा काढून जो उपयोगात येणार नाही तो आरडीएफ (रिफ्यूज ड्रायव्हर्ड फ्यूल) कचरा वीजनिर्मितीसाठी वापरला जाणार आहे. त्याची क्षमता 700 टन आहे. त्यापासून 14 मेगा वॅट वीज तयार करून ती भोसरीतील इंद्रायणीनगर येथील 22 केव्ही ग्रीड असलेल्या सबस्टेशनला जोडण्यात आली आहे.
सध्या प्रकल्पात चाचणी सुरू आहेत. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर 1.7 मेगा वॅट वीज तयार होत आहे. सर्व यंत्रणा तसेच, बॉयलर जसजसे कार्यान्वित होतील, तसे वीजनिर्मिती वाढविली जाणार आहे. सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर 14 मेगा वॅट वीज तयार केली जाईल.
अद्याप महावितरणकडून प्रक्रिया अपूर्ण
तयार केलेली वीज ही साठवून ठेवता येत नाही. ती महापालिका म्हणजे संबंधित ठेकेदार महावितरण कंपनीस देणार आहे. त्यासाठीचा विद्युतपुरवठा जोड इंद्रायणीनगर येथील सबस्टेशनला देण्यात आला आहे. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे अद्याप महावितरणकडून वीज घेण्यात सुरुवात झालेली नाही.
येत्या आठ दिवसांत तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होऊन महावितरणकडून वीज स्वीकारली जाईल. महावितरणला वेस्ट टू एनर्जीमधून जितकी वीज दिली जाईल, तितकी वीज महापालिकेस 5 रुपये प्रती युनिट दराने मिळणार आहे. ती वीज पालिका निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्र, रावेत अशुद्ध जलउपसा केंद्र आणि विविध मैलासांडपाणी केंद्रासाठी वापरण्यात येणार आहे.
हेही वाचा :