पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : मालमत्ता करांची बिले मालमत्ताधारकांना घरोघरी जाऊन वाटपासाठी महापालिका 90 लाख रुपये खर्च करणार आहे. हा निर्णय रद्द करून नागरिकांच्या कररुपी पैशाची उधळपट्टी थांबविण्यात यावी, अशी भूमिका चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनने घेतली आहे. त्यांनी याबाबत आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी म्हटले आहे की, महापालिकेकडून मालमत्ताकराच्या एक हजार कोटीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी करण्यात येत आहे.
शहरातील सर्व मालमत्ताधारकांना त्यांची मालमत्ता देयके घरपोच करण्यासाठी शहरातील बचतगटांमार्फत प्रत्येक बिलास 15 रुपये याप्रमाणे एकूण 90 लाख रुपये खर्च करण्यास महापालिका प्रशासनाने मान्यता दिली आहे. गतवर्षी हीच मालमत्ता बिले शहरातील सर्व मालमत्ताधारकांना पोस्टाने पाठविण्यासाठी 48 लाख रुपये खर्च केले होते.
परंतु महानगरपालिकेला मालमत्ता बिल सर्वांना घरपोच पाठविण्याचे उद्दिष्ट साध्य करता आले नाही. नागरिकांचा पत्ता न भेटणे व अन्य विविध कारणे त्यासाठी असतील. तथापि, त्यामुळे नागरिकांचे 48 लाख रुपये व्यर्थ गेले. तसेच या वर्षी देखील यासाठी 90 लाख रुपयाला मान्यता देऊन नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी करण्यात येणार आहे.
शहरातील सोसायट्यांना ग्रीन सोसायटीअंतर्गत मालमत्ताकरात सवलत देण्यासाठी महानगरपालिका 60 लाख रुपये सवलत देते. तर मालमत्ता बिलाचे वितरण करण्यासाठी प्रत्यक्ष 90 लाख रुपये खर्च करणार आहे. आयुक्तांनी ही सर्व बिले महापालिकेच्या कर्मचार्यांमार्फत वाटावीत. तसेच, पैशाची उधळपट्टी थांबवावी.
– संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशन