पुणे

वरवंड गावातील रस्त्यांची कामे प्रलंबित; ठेकेदाराचा मनमानी कारभार

अमृता चौगुले

खोर(ता. दौंड) ; पुढारी वृत्तसेवा : वरवंड येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून पुणे महानगर प्राधिकरण विकास यांच्यामार्फत येथे रस्त्याची विविध कामे मंजूर करण्यात आली. मात्र, ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे मागील एक वर्षापासून या कामाला सुरुवातच झाली नाही. वरवंड 26 फाटा राष्ट्रीय महामार्ग 65 ते धोंडदादा दिवेकर वस्ती या कामासाठी 101.25 लाखांचा निधी, तर वरवंड 26 फाटा राष्ट्रीय महामार्ग 65 ते शेरीचा मळा या कामासाठी 108 लाख रुपये निधीची पूर्तता करण्यात आली.

संबंधित कामाचे भूमिपूजन खासदार सुप्रिया सुळे, माजी आमदार रमेश थोरात, अप्पासाहेब पवार, वीरधवल जगदाळे व वैशाली नागवडे यांच्या उपस्थितीत दि. 21 एप्रिल 2022 रोजी पार पडले. मात्र, आज एक वर्ष उलटून ही या कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही. याबाबत वरवंडचे माजी उपसरपंच प्रदीप दिवेकर यांनी सांगितले की, दौंड तालुक्यातील ठेकेदार मे. सूर्या इन्फ—ास्ट्रक्चर यांना या कामाचे कंत्राट दिले आहे.

ही कामे मंजूर असून, या कामाची तांत्रिक मान्यता मिळालेली असतानादेखील जाणूनबुजून दीड वर्ष होऊन ही कामे चालू न करणार्‍या ठेकेदाराचा जाहीर निषेध गावाच्या वतीने करण्यात येत आहे. स्थानिक पदाधिकारी ठेकेदारास वारंवार फोन करत असतानादेखील ठेकेदार फोन घेत नाही, अशी तक्रार वरवंड ग्रामस्थांची आहे. केवळ राजकीय हस्तपक्षेप या कामात आडवा येत असल्याचे प्रदीप दिवेकर यांनी सांगितले.

…अन्यथा 15 दिवसांमध्ये आंदोलन
आगामी 15 दिवसांत ठेकेदाराने रस्त्याचे डांबरीकरण सुरू न केल्यास माजी आमदार रमेश थोरात आणि आप्पासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली गावातील कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ विरोधी पक्षनेते अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांना भेटून तक्रार करणार असल्याची माहिती प्रदीप दिवेकर यांनी दिली.

SCROLL FOR NEXT