पुणे : अरबी समुद्रात लक्षद्वीपजवळ शनिवारी (दि. 18) कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. या क्षेत्राच्या प्रभावामुळे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात पुढील तीन दिवसांत वादळी पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. त्यामुळे दिवाळी सणावर पावसाचे सावट पसरले आहे.
लक्षद्वीपजवळ केरळ व किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून, त्याची तीव्रता वाढत जाणार आहे. हे क्षेत्र उत्तर-पश्चिमेकडे प्रवास करण्याचा अंदाज आहे. याच्या प्रभावामुळे केरळ, तामिळनाडू तसेच पुद्दुचेरीमध्ये पुढील तीन दिवस जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे; तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा 'यलो अलर्ट' आहे. सोमवारी (दि. 20) मराठवाड्यात 'यलो अलर्ट' आहे.
नैर्ऋत्य मोसमी पावसाने गुरुवारी देशाचा निरोप घेतला. यावर्षी पावसाने भरभरून पडला आहे. ईशान्य मोसमी पाऊस लवकरच दक्षिणेकडे दाखल होणार आहे.
राज्यात 21 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे दिवाळी सणावर पावसाचे सावट पसरले आहे. 23 ते 30 ऑक्टोबरच्या आठवड्यात विदर्भ वगळता राज्यात पावसाची शक्यता आहे.