पुणे: वारजे भागात एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना समोर आली होती. दरम्यान, गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विभागाच्या पथकाने चोवीस तासांच्या आत या खुनाचा छडा लावत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आर्थिक कारणातून मित्रानेच साथीदाराच्या मदीतने हा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
राजेंद्र सुभाष ऐलगच्चे (वय 40, रा. स्वराज आर्केड, आंबेगाव) असे खून झालेल्याचे नाव आहे, तर पोलिसांनी शुभम राजेश शिंदे (25, रा. ताकवले कॉम्प्लेक्स, सिंहगड रोड, नांदेड सिटी), लकी सुरेंद्र सिंग (23, रा. खडकी ॲम्युनेशन फॅक्टरी), सुनील संतोष खलसे ऊर्फ एस. के. (19, रा. संभानगर झोपडपट्टी, हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर) यांना अटक केली असून, अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. शुभम शिंदे हा यातील मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे येथील आकाशनगरजवळील वन विभागाच्या टेकडीवरील सिमेंटच्या विसाव्याशेजारील निर्जन जागेत एकाचा मृतदेह वारजे पोलिसांना शुक्रवारी (दि. 23) मिळाला होता. कोणीतरी त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी मारून तसेच दगडाने चेहरा ठेचून त्याचा खून केला होता. त्याची ओळख पटली नव्हती. वारजे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.
या गुन्ह्याचा गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू होता. सहायक फौजदार बाळू गायकवाड व पोलिस अंमलदार साई कारके यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, गणपती माथा ते शिंदे पूल वारजेदरम्यान दोन संशयित थांबले असून, त्यांची काहीतरी गुन्हा केल्याचे त्यांच्या हालचाली व बोलण्यावरून वाटत आहे. या बातमीची खात्री करण्यासाठी पोलिस निरीक्षक दत्ताराम बागवे, सहायक पोलिस निरीक्षक वर्षा कावडे व अंमलदार तेथे गेले. पोलिसांना पाहून ते पळून जाऊ लागले. तेव्हा पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून पकडले. त्या दोघांना ताब्यात घेतले, त्यांच्याकडील माहितीवरून अन्य दोघांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे चौकशी केल्यावर राजेंद्र ऐलगच्चे यांनी एकाला 18 लाख रुपये दिले होते. शेअर ट्रेडिंगसाठी हे पैसे देण्यात आले होते. ते वसूल करून देतो, असे सांगून शुभम शिंदे याने 11 लाख रुपये घेतले होते. हे पैसे राजेंद्र ऐलगच्चे मागत होता. राजेंद्र ऐलगच्चे याला संपवले तर आपल्याला पैसे द्यावे लागणार नाही, असे समजून त्याने साथीदारांना मदतीला घेतले. राजेंद्र ऐलगच्चे यांना वारजे येथील शनी मंदिर टेकडी येथे 21 जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता बोलावले. त्याप्रमाणे राजेंद्र ऐलगच्चे तेथे आले. तेव्हा शुभम व त्याच्या साथीदारांनी लोखंडी हत्याराने गळ्यावर, छातीवर, पोटावर, पायावर वार केले. डोक्यात दगड घालून त्यांचा चेहरा विद्रूप करून टाकला. आरोपींना पुढील कारवाईसाठी वारजे माळवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कामगिरी केली.