पुणे: पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभागरचनेवर आत्तापर्यंत 595 हरकती आणि सूचना दाखल झाल्या आहेत. 22 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेत नागरिकांनी 1 सप्टेंबरपर्यंत हरकती नोंदविल्या असून, मांजरी-साडेसतरानळी प्रभागातून सर्वाधिक 175 हरकती प्राप्त झाल्या आहेत.
दरम्यान, हरकती दाखल करण्याचा गुरुवार (दि. 4) हा शेवटचा दिवस आहे. हरकती दाखल करण्यास मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केली असून, मुदतवाढ मिळणार का? याकडे पुणेकरांचे लक्ष लागून आहे. (Latest Pune News)
पुणे महानगरपालिकेची प्रारूप प्रभागरचना जाहीर झाली असून, यावर रोज हरकती दाखल केल्या जात आहेत. सोमवारपर्यंत 595 हरकती दाखल झाल्या. नर्हे-वडगाव बुद्रुक प्रभागातून 154, तर हडपसर-सातववाडी प्रभागातून 75 हरकती दाखल झाल्या आहेत.
त्याउलट शहरातील कल्याणीनगर-वडगाव शेरी, गोखलेनगर-वाकडेवाडी, बावधन-भुसारी कॉलनी, शिवाजीनगर-मॉडेल कॉलनी, शनिवार पेठ-महात्मा फुले मंडई, डेक्कन जिमखाना-हॅप्पी कॉलनी, कर्वेनगर-हिंगणे होम कॉलनी, मयूर कॉलनी-कोथरूड, सहकारनगर-पद्मावती आणि कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी या दहा प्रभागांतून एकही हरकत अथवा सूचना आलेली नाही.
सनसिटी-माणिकबाग, वारजे-पॉप्युलरनगर, कोंढवा खुर्द-कौसरबाग, बिबवेवाडी-महेश सोसायटी आणि मुकुंदनगर-सॅलिसबरी पार्क या प्रभागांतून प्रत्येकी एक हरकत दाखल झाली आहे. सध्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश हरकती सामान्य नागरिक आणि स्थानिक कार्यकर्त्यांकडूनच आल्या आहेत.
राजकीय पक्षांकडून शेवटच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात हरकती दाखल होण्याची शक्यता आहे. हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत 4 सप्टेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. मात्र, या मुदतीत वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती महापालिकेचे निवडणूक विभाग उपायुक्त प्रसाद काटकर यांनी दिली. मागील निवडणुकीत प्रभागरचनेवर सुमारे अडीच हजार हरकती दाखल झाल्या होत्या. त्या तुलनेत यंदाच्या दहा दिवसांत अल्प प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट होत आहे.